Congress : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची स्वबळाची भाषा काँग्रेसच्या किती नेत्यांना मान्य?
स्वबळाचा नारा देऊन नाना पटोलेंनी सत्तेतील भागिदार शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला शिंगावर घेतलंय असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. खुद्द शरद पवारांनी काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटलांशी चर्चा करुन नाराजी व्यक्त केल्याचं समजतंय. मात्र नाना पटोलेंची स्वबळाची भाषा काँग्रेसच्या किती नेत्यांन मान्य आहे? असा सवाल आता उपस्थित होतोय. पटोलेंच्या भूमिकेमुळं शिवसेना आणि राष्ट्रवादी दुखावलीय हे सांगण्यासाठी राजकीय पंडिताची गरज नाही. दिल्ली हायकमांडकडून प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी मिळाल्यानंतर पटोलेंनी स्वबळाची भाषा सुरु केली, पाठीत खंजीर खुपसला जात असल्याचा आरोप केला, पाळत ठेवली जात असल्याचा बॉम्बही फोडला. आणि या सगळ्यांवर महाविकास आघाडीचे जनक शरद पवारांनी नाराजी व्यक्त केल्यानंतरही नाना पटोले स्वबळाच्या नाऱ्यावर ठाम आहेत.