Maharashtra Vidhan Sabha : अधिवेशनातील खडाजंगी :ठाकरे-फडणवीस भेट,शिंदेंचे आमदार भिडले, काय काय घडलं?
Maharashtra Vidhan Sabha : अधिवेशनातील खडाजंगी :ठाकरे-फडणवीस भेट,शिंदेंचे आमदार भिडले, काय काय घडलं?
मुंबई : राज्याच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून (Maharashtra Vidhan Sabha) सुरुवात झाली आहे. मात्र अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून देणाऱ्या भेटीगाठी पाहायला मिळाल्या. लोकसभा निवडणुकीत एकमेकांवर टीका करताना कोणतीही तमा न बाळगाणारे, वैयक्तिक पातळीवर हीनकस टीका करणारे विरोधक एकत्र पाहायला मिळाले. भाजप नेते आणि उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांची माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासोबत भेट झाली. ती भेट होते ना होते तोच उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी एकाच लिफ्टने प्रवास केला. या भेटीदरम्यान, सर्व नेत्यांमध्ये हास्यविनोद पाहायला मिळालच, पण राजकीय टोलेबाजीही पाहायला मिळाली.
नेमकं काय घडलं?
14 व्या विधानसभेचे शेवटचे पावसाळी अधिवेशन आहे. या अधिवेशनात विरोधकांनी सरकारला घेरण्याची पूर्ण तयारी केली. मात्र अधिवेशनाला सुरुवात होण्यापूर्वीच मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या. संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी राजकीय परंपरा पाळत विरोधकांच्या भेटीगाठी घेतल्या. चंद्रकांत पाटील सर्वात आधी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या भेटीसाठी त्यांच्या दालनात पोहोचले.