CM Eknath Shinde Delhi : मुख्यमंत्री शिंदेंचा अचानक दिल्ली दौरा; मंत्रिमंडळ विस्तार होणार?
CM Eknath Shinde Delhi : मुख्यमंत्री शिंदेंचा अचानक दिल्ली दौरा; मंत्रिमंडळ विस्तार होणार? राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन तोंडावर असल्यामुळे मंत्रिमंडळ विस्ताराची जोरदार चर्चा आहे. त्यामुळे महायुतीमधील (Mahayuti) अनेक आमदार मंत्रिपदाच्या बोहल्यावर चढण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी रविवारी रात्री अचानक दिल्ली गाठल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. प्राथमिक माहितीनुसार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे रविवारी रात्री फार मोजक्या लोकांसह दिल्लीत गेले होते. दिल्लीत ते कोणाला भेटले, कोणाशी चर्चा केली, याचा तपशील अद्याप गुलदस्त्यात आहे. मात्र, काहीवेळ दिल्लीत थांबल्यानंतर एकनाथ शिंदे हे नागपूरमध्ये पोहोचले. एकनाथ शिंदे यांनी कोणालाही फारसा थांगपत्ता लागू न देता दिल्ली आणि नागपूरची वारी केल्याने सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु झाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हेदेखील आज दिल्लीला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सुरु असलेल्या घडामोडींविषयी उत्सुकता वाढली आहे. दरम्यान, भाजपचे नवीन प्रभारी या आठवड्यात मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव आणि मंत्री आश्विनी वैष्णव प्रभारी मुंबईत येऊन विधानसभा निवडणुकीबाबत आढावा घेतील. भाजपच्या नेत्यांसोबत बैठक घेऊन पुढील रणनीती ठरवली जाईल.