Buldhana : चहा आणि सिगारेट दिली नाही म्हणून डाॅक्टरने महिलेला केलं विवस्त्र
Buldhana : चहा आणि सिगारेट दिली नाही म्हणून डाॅक्टरने महिलेला केलं विवस्त्र अवघ्या महाराष्ट्राला (Maharashtra Crime) हादरवणारी घटना बुलढाण्यात (Buldhana Crime) घडली आहे. बुलढाण्यात छोटसं किराणा दुकान चालवणाऱ्या महिलेकडे जात मध्यरात्री तीन वाजता एका डॉक्टरानं सिगारेट आणि चहाची मागणी केली. पण आता खूप उशीर झाला आहे, तुम्ही सकाळी या, असं उत्तर महिलेनं दिल्यानं डॉक्टरला राग अनावर झाला. याच रागातून डॉक्टरनं महिलेला मारहाण केली आहे. सर्वात धक्कादायक आणि संतापजनक बाब म्हणजे, या डॉक्टरनं महिलेला निर्वस्त्र करून मारहाण केल्याची माहिती मिळत आहे. या घटनेत महिला गंभीर जखमी झाली आहे. बुलढाण्यातली जळगाव जमोद तालुक्यात राहणारी एक महिला किराणा मालाचं एक छोटंसं दुकान चालवते. महिलेचं दुकान घराला लागूनच आहे. अशातच मध्यरात्री तीन वाजता एका डॉक्टरनं महिलेच्या दुकानाचा दरवाजा ठोठावला. महिलेनं दार उघडलं. त्यावेळी डॉक्टरनं महिलेकडे एक सिगारेट आणि चहाची मागणी केली. मात्र, महिलेनं डॉक्टरला स्पष्ट नकार दिला. आता फार उशीर झाला आहे, तुम्ही उद्या या, असं महिलेनं स्पष्ट सांगितलं. पण महिलेनं दिलेल्या नकारानं डॉक्टरला राग अनावर झाला. त्यानं महिलेला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. महिलेचे कपडे फाडले आणि तिला निर्वस्त्र देखील केलं. गोविंद वानखेडे असं महिलेला निर्वस्त्र करुन मारहाण करणाऱ्या नराधम डॉक्टरचं नाव आहे. ही धक्कादायक घटना बुलढाण्यातली जळगाव जामोद येथे घडली आहे. या घटनेत महिला गंभीर जखमी झाली आहे. सध्या महिलेला खामगाव येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.