Aurangabad name change issue | शहराचं नाव बदलून वातावरण खराब करण्याची गरज नाही : बाळासाहेब थोरात PC
सध्या औरंगाबादच्या नामांतराचा मुद्दा चर्चेत आहे. औरंगाबाद महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर औरंगाबाद शहराचं नामांतर करण्याच्या हालचाली ठाकरे सरकारकडून सुरु झाल्या आहेत. अशातच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी याप्रकरणी काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली आहे. एखाद्या शहराचं, परिसराचं नाव बदलून तिथलं वातावरण बिघडवू नका, असं बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे. जरी शहराचं नाव बदललं गेलं तरी लोकांच्या आयुष्यावर त्याचा काय परिणाम होतो? काय फरक पडतो? असा सवालही यावेळी बाळासाहेब थोरात यांनी उपस्थित केला आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात बोलताना म्हणाले की, "उत्तम काम कसं होऊ शकतं याचा आदर्श महाविकास आघाडीने घालून दिलेला आहे. पण असं असलं तरीदेखील कोणत्याही एका शहराचं, गावाचं नाव बदलून वातावरण प्रदूषिक करण्याचं काही कारण नाही, हे आमचं स्पष्ट मत आहे. तो किमान समान कार्यक्रमाचा भागही नाही, त्यामुळे अशा प्रकारांना आमचा पहिल्यापासून विरोध आहे. छत्रपती संभाजी महाराज आमचेही आदर्श आहेत. सर्वांचेच श्रद्धास्थान आहेत. परंतु, याप्रकरणात सामाजिक तेढ वाढू नये याची काळजी घेणं आवश्यक आहे. खरंतर जिथे सरकारी डिपार्टमेंट काम करतं तिथे अशाप्रकारची चूक होता कामा नये, म्हणून मी त्यासंदर्भातील ट्वीट केलेलं आहे."