Pandharpur Ashadhi Ekadashi ला मानाच्या पालख्यांसोबत येणाऱ्या 400 वारकऱ्यांना विठ्ठलाचं दर्शन मिळणार
मुंबई : पंढरपूर येथील आषाढी यात्रेनिमित्त विठुरायाच्या दर्शनासाठी उद्यापासून (गुरुवारी 1 जुलै) पालख्याचं प्रस्थान होणार आहे. मात्र, यंदाही कोरोना संसर्गामुळे यात्रा आणि पालख्यांवर निर्बंध असणार आहेत. त्यानुसार आषाढी एकादशीला मानाच्या 10 पालखी सोहळ्यात येणाऱ्या 400 भाविकांना विठुरायाचे दर्शन मिळणार आहे, असा निर्णय आषाढी यात्रा बैठकीत झाला आहे. तर दुसरीकडे या निर्णयाला भाजपचे आध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष तुषार भोसले यांनी विरोध केला आहे.
पंढपूरच्या आषाढी कार्तिकी यात्रेसाठी उद्यापासून पालख्याचं प्रस्थान होणार आहे. उद्या देहू येथील तुकोबांच्या आणि परवा आळंदी येथून ज्ञानोबा माऊलींच्या पालखीचं प्रस्थान आहे. पण, कोरोना निर्बंधामुळे पालख्यांचा फक्त प्रस्थान सोहळा होईल. त्यांनतर पादुका मंदिरातच विसावतील. आषाढीच्या आधी त्या एसटीने पंढरपूरकडे रवाना होतील, असा निर्णय शासनाने घेतला आहे.