अजित पवारांच्या CBI चौकशीची भाजपची मागणी, नवाब मलिक म्हणाले...
मुंबई: भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (BJP Chandrakant Patil) यांनी पुन्हा एकदा अजित पवारांच्या (Ajit Pawar) विरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. याआधी भाजप कार्यकारिणीच्या बैठकीत अजित पवार आणि अनिल परब यांच्या सीबीआय चौकशीचा ठराव मंजूर केल्यानंतर आता चंद्रकांत पाटील यांनी गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहिले आहे. अजित पवार यांची सीबीआय चौकशी करण्यात यावी अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी लिहिलेल्या पत्रात केली आहे.
चंद्रकांत पाटील यांनी पत्रात काय म्हटलंय?
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्याविरोधात सचिन वाझे याच्या पत्रात वसुलीचे गंभीर आरोप आहेत.
सीबीआयतर्फे या प्रकरणाची सखोल चौकशी करावी.
भाजपाच्या प्रदेश कार्यसमितीने या मंत्र्यांच्या सीबीआय चौकशीच्या मागणीचा केला होता ठराव.
प्रदेश भाजपच्या एक कोटी दहा लाख सदस्यांतर्फे आपण मागणी करत आहोत.
भाजप कार्यकारिणीत नेमका काय ठराव मांडला होता?
भाजप कार्यकारणीत मांडलेल्या ठरावात म्हटलं आहे की, सातत्याने महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांचे कारनामे उघडकीस येत आहेत. बदल्यांमधील भ्रष्टाचाराचे प्रकरण उघड झाल्यानंतर त्यानुसार कारवाई करण्याच्या ऐवजी हा भ्रष्टाचार उघड करणाऱ्यांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्याचा धक्कादायक प्रकार महाविकास आघाडी सरकारकडून चालू आहे. गृहमंत्र्यांवरील वसुलीच्या आरोपाप्रमाणेच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री अनिल परब यांच्यावर बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे याने वसुलीचा आरोप केला. परमबीरसिंग यांच्या पत्राच्या आधारे अनिल देशमुख यांची सीबीआय चौकशी करण्यात येत आहे. तशीच सीबीआय चौकशी अजित पवार आणि अनिल परब यांचीही करावी, अशी मागणी ही कार्यकारिणी करत आहे, असा ठराव मांडला होता.