Amol Kolhe : पोरांना कळलं जनता नापास करणार, निवडणूक पुढे ढकलली; अमोल कोल्हेंचा हल्लाबोल

Continues below advertisement

Amol Kolhe in Maharashtra Assembly Election 2024 : परभणी : महाराष्ट्रातील जनतेनं सरकारला नापास केलं आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सत्ताधाऱ्यांनी दिल्लीतील पिताश्रीला सांगून निवडणूक पुढे ढकलली, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांनी भाजप प्रणित महायुती सरकारवर जोरदार हल्ला केला आहे. तसेच, गेल्या पंधरा वर्षांत पहिल्यांदाच महाराष्ट्र आणि हरियाणा यांची निवडणूक एकत्र होत नसल्याचंही अमोल कोल्हे म्हणाले आहेत. 

परभणीच्या गंगाखेडमध्ये आयोजित शिवस्वराज्य यात्रेच्या निमितानं आयोजित करण्यात आलेल्या सभेत अमोल कोल्हे बोलत होते. या सभेला गंगाखेड मधील राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे माजी आमदार सीताराम घनदाट यांच्यासह मोठ्या संख्येनं राष्ट्रवादीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते, यावेळी बोलताना अमोल कोल्हे यांनी कॉलेजच्या विद्यार्थ्यांचं उदाहरण देत सरकारवर निवडणूक पुढे ढकलल्याचा आरोप करत जोरदार हल्ला चढवला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार अमोल कोल्हे म्हणाले की, "कॉसेजमध्ये ज्याचं चालत होतं, कॉलेजच्या मालकाचं ते पोरगं होतं. त्या पोराचा अभ्यासच झाला नव्हता परीक्षेचा. त्या पोराला दररोज वाटायचं, परीक्षेत नापास होईल की काय? परीक्षेत नापास होईल की काय? पोरांनी लय प्रयत्न केले, गाईड बघितलं, कॉपी केली, सगळं सगळं केलं. पण तरीही पोरांची गॅरंटीच पटली, काहीही झालं तरी आपण नापासंच होणार. जेव्हा पोरांची गॅरंटी पटली, त्यावेळी त्यांना बापाला जाऊन सांगितलं. जरा परीक्षा पुढे ढकला ना... बापानं विचारलं परीक्षा कशाला पुढे ढकलायची रे? नियमानुसार आता परीक्षा झाली पाहिजे. दादा... अभ्यासच नाही झालाय... अभ्यासच झाला नसेल, तर परीक्षा पुढे ढकला. पोरगं कोण कळालं का?"

सरकारचं धाकधुक धाकधुक व्हायला लागलंय म्हणूनच निवडणूक पुढे ढकलली : अमोल कोल्हे 

"जी ऑक्टोबरमध्ये व्हायची, ती नोव्हेंबरमध्ये होण्याची शक्यता निर्माण झाली, कारण पोराला कळलं महाराष्ट्राची जनता नापास होणार आहे... म्हणून महायुती सरकारनं त्यांच्या दिल्लीतील पिताश्रींना सांगितलं, तेवढं निवडणूक आयोगाला सांगा, कुठलातरी क्लॉज वापरा. 15 वर्ष हरियाणा आणि महाराष्ट्राची निवडणूक बरोबर व्हायची, यंदा पहिल्यांदाच महाराष्ट्राची निवडणूक हरियाणाबरोबर होत नाही. माननिय निवडणूक आयोगानं पाऊस पितृपक्ष, गणेशोत्सव, दिवाळी कितीही कारणं दिली असली, तरी महाराष्ट्रातील जनतेला ठाऊक आहे, सरकारचं धाकधुक धाकधुक व्हायला लागलंय आणि म्हणूनच निवडणूक पुढे ढकलंली.", असं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार अमोल कोल्हे म्हणाले. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram