Amarnath Yatra | कडेकोट बंदोबस्तात बाबा बर्फानीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी!

प्रसिद्ध अमरनाथ यात्रेला 'बम बम भोले' आणि 'हर हर महादेव' च्या जयघोषात सुरुवात झाली आहे. देशभरातून लाखो भाविक काश्मीरमधील अमरनाथ गुहेतील बाबा बर्फानीच्या दर्शनासाठी पोहोचतात. यंदा ३ जुलैपासून या यात्रेला सुरुवात झाली असून ती ८ ऑगस्टला संपणार आहे. अमरनाथाच्या गुहेपर्यंत पोहोचण्यासाठीचा प्रवास खडतर आहे. बालताल आणि पहलगाम असे दोन मार्ग या यात्रेसाठी आहेत. बालताल बेस कॅम्प ते अमरनाथ गुहा हे अंतर १६ किलोमीटरपेक्षा जास्त असून, हा डोंगराळ मार्ग पायी, डोली किंवा घोड्यावरून पार करायला जवळपास सात ते आठ तास लागतात. वाटेत वाहती नदी, धबधबे आणि भक्तांसाठीचे लंगर यात्रेकरूंना मदत करतात. पहलगाम हल्ल्यानंतर या यात्रेसाठी सुरक्षा व्यवस्था मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आली आहे. नोंदणीकृत भाविकांनाच यात्रेसाठी परवानगी आहे. बालताल बेस कॅम्पवर पोलिसांकडून कसून तपासणी केली जाते. अमरनाथ मार्गावर भारतीय लष्कर आणि जम्मू काश्मीर पोलिसांसह विविध सुरक्षा यंत्रणांचे तब्बल ऐंशी हजार जवान तैनात आहेत. श्रीनगर विमानतळापासून अमरनाथ गुहेपर्यंत सैनिकांचा कडेकोट पहारा आहे. अमरनाथ गुहेत कोणालाही व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जात नाही. सकाळी सहा ते संध्याकाळी सातपर्यंत दर्शनाची व्यवस्था आहे. यात्रेकरूंनी सुरक्षा व्यवस्थेबद्दल समाधान व्यक्त केले आहे. एका भाविकाने सांगितले, "खूप सेफ्टी खूप सेफ्टी आहे. खूप खूप बंदोबस्त छान आहे. चांगलं नियोजन केलेलं आहे यांनी, बर, आणि खूप छान वाटतंय इकडे." एबीपी माझाची टीम काश्मीरमध्ये पोहोचली असून, आमचे प्रतिनिधी मिकी घई यांनी या यात्रेचे सविस्तर वृत्तांकन केले आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola