NCP Ajit Pawar : अजितदादांनी भर सभेत खडसावलं, आता उमेश पाटलांची मोठी घोषणा ABP MAJHA
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दोन गट पडल्यानंतर आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीत मोहोळ मतदारसंघातच दोन गट पडल्याचे पाहायला मिळत आहेत. कारण, सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ विधानसभा मतदारसंघात आज जनसन्मान यात्रेच्या निमित्ताने अजित पवारांचा दौरा लक्षवेधी ठरला. या दौऱ्यात अजित पवारांनी नाव न घेता राष्ट्रवादीचे (NCP) प्रवक्ते आणि मोहोळचे सुपुत्र उमेश पाटील (Umesh patil) यांना चांगलंच झापलं. अजित पवारांचा यापूर्वीचा दौरा माझ्यामुळे रद्द झाला, असं कोणीतरी म्हटलं, हा संदर्भ देत अजित पवारांनी चक्क कुत्र्याची उपमा देत नाव न घेता उमेश पाटलांना सुनावलं होतं. आता, उमेश पाटील यांनी अजित पवारांच्या (Ajit Pawar) वक्तव्यावर भाष्य केलंय. तसेच, मी ते वक्तव्य केलंच नव्हतं, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.
प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना माझ्यावर बोलण्याचा अधिकार आहे. माझं फक्त त्यांना एकच सांगणं आहे की, जी कारवाई होईल ती सिलेक्टिव्ह कारवाई नको. कारण, राजन पाटील यांनी कोणत्याही प्रकारची पार्लमेंटरी बोर्डाची बैठक झाली नसताना देखील परस्पर मोहोळ विधानसभेचा उमेदवार घोषित कसा काय केला? यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई व्हायला नको का?, असा सवाल उमेश पाटील यांनी विचारला. तसेच, आमदार यशवंत माने हे शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांना सोबत घेऊन फिरतात आणि अजित पवारांना दिलेल्या निधीच्या कार्यक्रमांची उद्घाटन त्यांच्यासमवेत करतात हे पक्षशिस्त मोडणारे नाही का?, असे दोन प्रश्न उपस्थित करत या दोन्ही नेत्यांवर कारवाईची मागणी उमेश पाटील यांनी केली आहे.