Ajit Pawar Speech : अल्लाह किंवा देवाच्या कृपेने नव्हे, नवऱ्याच्या कृपेने मुलं-बाळं होतात..
Ajit Pawar Speech : अल्लाह किंवा देवाच्या कृपेने नव्हे, नवऱ्याच्या कृपेने मुलं-बाळं होतात..
पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) पुन्हा वाढत्या लोकसंख्येवर भाष्य केले आहे. अल्ला किंवा देवाच्या कृपेने मुलं होत नाही तर नवऱ्याच्या कृपेने मुलं-बाळं होतात, त्यामुळे दोनवरच थांबा, असा प्रेमळ सल्ला अजित पवारांनी महिलांना दिला आहे. मावळच्या कार्यक्रमात त्यांनी उपस्थित महिलांना संबोधित करताना हे वक्तव्य केले. त्यांच्या वक्तव्यानंतर सभा मंडपात एकच हशा पिकला . पुण्यातील मावळमध्ये जनसन्मान यात्रेत महिला मेळावा संपन्न झाला.
अजित पवार म्हणाले, माय- माऊलींनो वाईट वाटून घेऊ नका. मला सगळ्या जाती धर्माच्या महिलांना हात जोडून सांगायचे आहे. मुलं, बाळं होतात. देवाची कृपा, अल्लाची कृपा नसते . ही नवऱ्याची कृपा असते म्हणून मुलं बाळ होतात. त्यामुळे दोन अपत्यावर थांबा... माझ्या मावळात आदिवासी समाज, मागासवर्गीय समाज आहे. लहान कुंटुब ठेवले तर या योजनांचा फायदा तुम्हाला अधिक होईल. त्या दोन मुलांचे चांगले संगोपन करता येईल. तसेच चांगले शिक्षण देता येईल.. तुम्हाला पण चांगले जीवन जगता येईल.
भूलथापांना बळी पडू नका : अजित पवार
अजित पवार म्हणाले, दोन कोटी महिलांना पैसे देणार आहोत. बजेटमध्ये तरतूद केलेली आहे. कोणी काहीही म्हणेल, आम्ही पैसे परत घेणार नाही. रक्षाबंधनाला भावाला राखी बांधणाऱ्या बहिणीला दिलेली ओवाळणी परत घेतो का? अजिबात नाही. कोणी काहीही अफवा पसरवत आहे, तुम्हाला हे पैसे कायम भेटतील. पुढचं लाईट बिल येणार नाही अन् मागचं लाईट बिल भरायचं नाही. अनेक जण मला म्हणतात दादा गुलाबी रंगाचे जॅकेट घालताय, महिलांना आवडतं म्हणून का? हो, महिलांना आवडतं म्हणून घालतो. त्यात काही मी वेडंवाकडं केलं का? उगाच काहीही बोलायचं म्हणून बोलतात.