
ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 11 February 2025
ओएसडी, पीए नेमण्याबाबत मुख्यमंत्र्यांची रोखठोक भूमिका...काही ओएसडींचे दलालांशी संबंध..सेनेच्या मंत्र्यांना फडणवीसांचं स्पष्ट उत्तर..
शिंदेंच्या शिवसेनेच्या आमदारांशिवाय अजित पवारांच्या दालनात रायगडसाठी बैठक, आदिती तटकरेंची उपस्थिती मात्र गोगावलेंची दांडी, पालकमंत्रिपदावरून महायुतीतली धुसफूस कायम
एकनाथ शिंदेच्या समावेशासाठी आपत्ती व्यवस्थापन समितीच्या नियमांत बदल, महायुतीतल्या वितुष्ट निर्माण होण्याचा पार्श्वभूमीवर निर्णय फिरवण्याचा विचार केल्याची माहिती
मंत्रिमंडळाच्या बैठकीत माघी गणेशोत्सवाच्या विसर्जनाच्या मुद्द्यावरुन घमासान, गणेशोत्सवासंदर्भातल्या उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याची शक्यता
काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस हेमलता पाटीलांचा शिंदेंच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश, विधानसभा निवडणुकीत नाशिक मध्य जागेचं तिकीट काँग्रेसने न दिल्याने हेमलता पाटील होत्या नाराज
पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्समध्ये एआय समिटच्या मंचावर दाखल, मानवतेच्या कल्याणासाठी एआय तंत्रज्ञान उपयुक्त, पंतप्रधानांचं वक्तव्य, एआयमुळे येणाऱ्या संकटाचंही भान ठेवण्याचं आवाहन
माघी गणेशोत्सवातल्या गणेशमूर्तींच्या विसर्जनाच्या मुद्द्यावरुन आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतही घमासान झाल्याचं पाहायला मिळालं. पीओपी गणेशमूर्ती समुद्रात विसर्जन न करण्यासंदर्भात उच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयाविरोधात राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याची शक्यता आहे. या बैठकीनंतर उपस्थित अधिकाऱ्यांना बाहेर जाण्यास सांगून, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी माघी गणेशोत्सवासंदर्भात नियमांच्या पालनावरुन अडेलतट्टू भूमिका घेणाऱ्या अधिकाऱ्यांवर ताशेरे ओढले. तसंच अधिकाऱ्यांकडून हिंदूविरोधी भूमिका घेतली जात असल्याची तक्रार आशिष शेलारांनी केली. उच्च न्यायालयाच्या निर्णयाचं पालन करण्यावरुन अधिकाऱ्यांकडून दुटप्पी न्याय का?, असा प्रश्न शेलारांकडून मंत्रिमंडळाच्या बैठकीत उपस्थित करण्यात आला.
माघी गणेशोत्सव मंडळाच्या गणेशमूर्ती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतल्या कांदिवलीच्या चारकोपमधील हिंदुस्तान नाक्यावर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. उच्च न्यायालयाच्या नियमाचा आधार घेऊन पीओपी मूर्तीच्या समुद्रातल्या विसर्जनाला मुंबई महापालिकेनं परवानगी नाकारली आहे. या निर्णयामुळं गणेश मंडळांचे पदाधिकारी अस्वस्थ असल्याचं चित्र होतं. चारकोपच्या राजा मंडळानं आज गणपती विसर्जन न करण्याची भूमिका घेतली आहे. तसंच मुंबईतील अनेक गणेशोत्सव मंडळं आज चारकोप हिंदुस्तान नाक्यावर जमणार असं सांगण्यात येत होतं. त्याच पार्श्वभूमीवर हिंदुस्तान नाक्यावरून आढावा घेतला आहे आमचा प्रतिनिधी अजय मानेनं.
आता बातमी आहे महायुतीमध्ये सुरू असलेल्या धुसफूशीची...
आज झालेल्या राज्य सरकारच्या कॅबिनेटमध्ये शिवसेना मंत्र्यांची नाराजी समोर आलीय.. मंत्र्यांचे ओसडी आणि पीएच्या नेमणूका का होत नाही, असा सवाल शिवसेना मंत्र्यांनी कॅबिनेटमध्ये उपस्थित केला.. या चर्चेवेळी बैठकीतून अधिकारी वर्गाला बाहेर ठेवण्यात आलं होतं... यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आपली भूमिका स्पष्ट केलीय.. अनेक वर्षांपासून सातत्याने ओएसडी आणि पीए असणाऱ्यांचे दलालांशी संबंध असतात.. त्यामुळे शिफारस झाली तरी अशा अधिकाऱ्यांना ठेवणार नसल्याचं फडणवीसांनी सांगितलंय... दरम्यान कॅबिनेटमधल्या या चर्चेनंतर काही मंत्र्यांचे ओएसडी आणि खासगी सचिवांच्या यादीला मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिलीय.. तर अद्याप काही मंत्री प्रतीक्षेत आहेत...