कोळसा टेंडरमध्ये 45,000 कोटींचा घोटाळा! राष्ट्रवादी नेते प्रशांत पवार यांचा गंभीर आरोप : नागपूर
काँग्रेस अध्यक्ष नाना पाटोले ह्यांनी वीज निर्मिती करणाऱ्या महाजेनकोला पुरवल्या जाणाऱ्या कोळसा खरेदी व वॉशिंग प्रक्रियेसाठी महाराष्ट्र खनिकर्म महामंडळाने काढलेल्या टेंडरबाबत प्रश्न उचलत मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. मात्र आज पटोले ज्या जय जवान, जय किसान संघटनेचे मार्गदर्शक आहेत, त्याच संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आणि राष्ट्रवादीचे नेते प्रशांत पवार ह्यांनी मात्र नागपुरात पत्र परिषद बोलवत ह्यापेक्षा ही मोठा घोटाळा कोळसा टेंडरमध्ये असल्याचा आरोप केला.
"मी नाना पटोले ह्यांचे अभिनंदन करतो की त्यांनी हा विषय उचलला. मात्र त्यांचा विषय फक्त रुखमाई इन्फ्राच्या पात्रतेबद्दल आहे. पण इथे तर रुखमाईला कंत्राट मिळण्याची प्रक्रिया अजून पूर्ण झाली ही नाहीये. जी प्रक्रिया पूर्ण झाली आहे त्यात ह्याहून ही मोठा घोळ आहे जो रुपये 45000 कोटीच्या घरात आहे," असा दावा प्रशांत पवार ह्यांनी केला.
त्यांनी कोळसा वॉशिंग मधील अपात्र ठरवण्यात आलेल्या 15% कोळसा विक्रीच्या कंत्राटावर खऱ्या अर्थाने कुठलेच नियंत्रण नसल्याचे सांगितले. तसेच ह्यावर नियंत्रण ठेवायला ज्या महाराष्ट्र खनिकर्म महामंडळाला अधिकार दिला आहे त्यांच्याकडे हे करण्याची कुठलीच साधन सामुग्री किंवा मनुष्यबळ नसल्याचा ही आरोप पवार ह्यांनी केला आहे. त्यामुळे त्यांनी ह्या कंत्राट जो हिंद एनर्जी अँड कोल तसेच अरिहंत नावाच्या कंपनीला मिळाला आहे त्याची चौकशी ईडी किंवा सीबीआय मार्फत करावी अशी मागणी केली.