2006 Blasts Case: हायकोर्टाच्या निकालाला SC मध्ये आव्हान, सरकार गंभीर.
दोन हजार सहा सालच्या साखळी स्फोटांबाबत मुंबई हायकोर्टाने दिलेल्या निकालाला राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. महाराष्ट्र एटीएसने सर्वोच्च न्यायालयात हायकोर्टाच्या निकालाला आव्हान दिले असून, तातडीने सुनावणीची मागणी केली आहे. सरन्यायाधीशांनी या प्रकरणावर चोवीस जुलैला सुनावणी घेण्यास मंजुरी दिली आहे. काल मुंबई हायकोर्टाने या प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली होती. त्यापैकी काही आरोपी आज जेलमधून बाहेर देखील आले. राज्य सरकारने या निकालाची गंभीर दखल घेत सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे आणि हायकोर्टाच्या निर्णयाचा फेरविचार व्हावा अशी मागणी केली आहे. हायकोर्टाने तपास यंत्रणांच्या तपास पद्धतीवर अनेक निरीक्षणं नोंदवली होती. दोन हजार सहा मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटात बारा आरोपींना पकडण्यात आले होते. या सुनावणीदरम्यान एका आरोपीचा मृत्यू झाला, तर अकरा जणांची पुरेशा पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली. यापूर्वी पाच जणांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती, तर सात जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. फाशीची परवानगी मिळावी यासाठी राज्य सरकार हायकोर्टात गेले होते, मात्र हायकोर्टाचा निकाल वेगळा ठरला आणि तो सगळ्यांना संभ्रमात टाकणारा होता.