2 महिन्यात 20 हजार पर्यटकांनी केली ताडोबा सफारी, लॉकडाउनला कंटाळलेल्या लोकांची ताडोबाला पसंती
Tadoba : ताडोबा व्याघ्र प्रकल्पाचा बफर झोन 1 जुलै पासून पर्यटनासाठी खुला करण्यात आलाय आणि ताडोबा व्याघ्र प्रकल्पात अवघ्या 2 महिन्यात 20 हजार पर्यटकांनी ताडोबा सफारी केली आहे. विशेष म्हणजे सध्या ताडोबा व्याघ्र प्रकल्पाचा कोर झोन पावसामुळे पर्यटकांसाठी बंद करण्यात आला आहे. ताडोबात येणारे पर्यटक कोर झोन मध्ये सफारी करण्यास पहिली पसंती देतात पण यावेळी बफर मध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटकांनी गर्दी केल्याचं चित्र पाहायला मिळतंय.
बफर क्षेत्रात 13 प्रवेशद्वार असून सर्वच गेट वरून पर्यटक ताडोबाच्या बफर क्षेत्रात सफारी करताहेत. कोरोनामुळे लावण्यात आलेला लॉकडाउन गेल्या 3 महिन्यांपासून शिथिल करण्यात आलाय आणि त्यामुळे लॉक डाउनला कंटाळलेले लोकं ताडोबाच्या निसर्गरम्य जंगलाची सफारी करताहेत. ताडोबाच्या कोर झोन प्रमाणे बफर मध्ये देखील वाघ, बिबट, अस्वल, रानगवे, हरीण आणि इतर प्राण्यांचं दर्शन होतं आणि त्यामुळे पर्यटकांना सफारी पुरेपूर आनंद घेता येतो. ताडोबात येणाऱ्या या पर्यटकांमुळे स्थानिकांच्या उद्योग-व्यवसायाला पण गती मिळाली आहे. कोरोनामुळे अनेक जणांच्या पोटापाण्याचा प्रश्न गंभीर झाला असतांना ताडोबातील पर्यटन स्थानिकांसाठी वरदान ठरतंय. गेल्या 2 महिण्यात फक्त गाईड आणि जिप्सीचालकांना पर्यटकांच्या माध्यमातून 2 कोटी रुपये मिळाले आहे.