Ladki Bahin Yojana : आधार ते मिनिमम बॅलेंस, दोन गोष्टींमुळे रखडतायत लाडक्या बहिणींचे पैसे
Ladki Bahin Yojana : आधार ते मिनिमम बॅलेंस, दोन गोष्टींमुळे रखडतायत लाडक्या बहिणींचे पैसे
मुंबई : राज्य सरकारकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana) राबवली जात आहे. या योजनेच्या माध्यमातून सध्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट अशा दोन महिन्यांचे एकून तीन हजार रूपये दिले जात आहेत. अर्ज अद्याप मंजूर न झालेल्या पात्र महिलांना सप्टेंबर महिन्यात एकूण 4500 रुपये दिले जाणार आहेत. याच कारणामुळे सध्या महिलांची बँकांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. खात्यात जमा झालेले पैसे काढण्यासाठी, पैसे आले आहेत का? हे तपासण्यासाठी तसेच आधार क्रमांक बँक खात्याला लिंक करण्यासाठी (Aadhaar Bank Seeding) महिला मोठ्या प्रमाणात बँकेत गर्दी करत आहेत. याच कारणामुळे आता बँक कर्मचारी संघटनांनी थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. मुख्यमंत्र्यांनी बँकेत सुरक्षा पुरवावी, अशी मागणी या संघटनांनी केली आहे.
सुरक्षा पुरवण्याची बँक संघटनांची मागणी
माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यात पैसे जमा होऊ लागले आहेत. मात्र ज्या महिलांच्या खात्यात अद्याप पैसै मिळाले नाहीत अशा महिला बँकेत गर्दी करत आहेत. सोबतच कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी, आधार लिंक स्टेटस पाहण्यासाठीही महिलांची बँकेत मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. आपले काम लवकर पूर्ण व्हावे यासाठी अनेक महिला बँक कर्मचाऱ्यांशी भांडणही करत आहेत. याच कारणामुळे महिलांची बँकांत होणारी वाढती गर्दी लक्षात घेता बँख कर्मचारी संघटनांनी मुख्यमंत्र्यांना बँकेत सुरक्षा पुरविण्याची मागणी केली आहे.