Panhala Fort : पन्हाळगडावर दारुपार्टीनंतर संतापाचा कडेलोट, हजारो शिवभक्त गडाच्या सुरक्षेसाठी एकवटले

Continues below advertisement

Panhala Fort : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या किल्ले पन्हाळगडावर पर्यटकांची ओली पार्टी समोर आल्यानंतर राज्यभरातील शिवभक्त चांगलेच आक्रमक झाले आहेत. त्यांनी आज या दारुड्यांविरोधात एल्गार करताना पन्हाळगडावर एकवटले. गडावरील झुणका भाकर केंद्रांमध्ये काही पर्यटकांनी दारू ढोसल्याचे समोर आल्यानंतर शिवभक्तांच्या संतापाचा कडेलोट झाला. राज्यभरातील शिवभक्तांनी एकत्र येत या सर्व प्रकाराला विरोध करताना तीव्र निषेध व्यक्त केलाच राज्यात होत असलेल्या किल्ल्यांच्या पडझडीवरून झोपी गेलेल्या पुरातत्व विभागाला जागे करण्याचा प्रयत्न केला. 

महाराष्ट्रातील शिवरायांनी बांधलेल्या अनेक किल्ल्यांची सातत्याने पडझड होत आहे. मात्र पुरातत्व विभाग, महाराष्ट्र सरकार असेल किंवा केंद्र सरकार असेल त्यांच्याकडून कोणतीही कारवाई होत नसल्याने शिवभक्त हे चांगलेच नाराज आहेत. काही दिवसांपूर्वीच पन्हाळगडावरील बुरूज ढासळला होता. गेल्यावर्षीही त्या ठिकाणी बुरुज ढासळण्याची घटना घडली होती.

पुरातत्त्व खात्याकडून कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नसल्याने चांगलाच संताप व्यक्त होत आहे. गडावरील विभागाचे कार्यालयही सुद्धा बंद अवस्थेत असल्याने काही दिवसांपूर्वी संभाजी ब्रिगेडकडून या संदर्भामध्ये आंदोलन करण्यात आलं होतं. गडावर कडेलोट आंदोलन करत आपली नाराजी व्यक्त केली होती. लवकरात लवकर या ठिकाणी जर कार्यालय पुरातत्त्व विभागाचे कार्यालय सुरू नाही झालं, तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.

राज्यभरातील जे गडकिल्ले आहेत त्यांची डागडुजी करण्यात यावी, त्यांची पडझड रोखावी अशी एकमुखाने मागणी शिवभक्तांनी केली. या ठिकाणी राज्यभरातून शिवभक्त एकत्र झाले होते. दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यातील आणखी एक किल्ला विशाळगड आहे त्या ठिकाणी सुद्धा काही दिवसांपूर्वी बुरुज ढासळल्याची घटना घडली होती. त्या ठिकाणीही सह्याद्री प्रतिष्ठानच्या 400 शिवभक्तांनी एकत्र येत सर्व दगड रणटेकडीवर सुरक्षित ठेवले होते. त्यामुळे गडकिल्ल्यांची ढासळण्याची मालिका सुरु आहे, ती कुठेतरी थांबवावी असा सूर शिवभक्त आणि महाराष्ट्र जनतेतून व्यक्त होत आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram