Uddhav Thackeray PC New Delhi : शेख हसिनांना संरक्षण देत असाल तर बांगलादेशातील हिंदूंचंही रक्षण करा
Uddhav Thackeray PC New Delhi : शेख हसिनांना संरक्षण देत असाल तर बांगलादेशातील हिंदूंचंही रक्षण करा
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिल्ली दौऱ्यावर आहेत. आज (7 जुलै) दिल्लीमध्ये पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी बांगलादेशमधील स्थितीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर खोचक शब्दांमध्ये टीका केली. अमित शाह आणि पीएम मोदी मणिपूरला जाऊ शकले नाहीत ते बांगलादेशला जाणार असेल तर त्यांनी जावं आणि ज्या पद्धतीने रशिया- युक्रेन युद्ध थांबवलं म्हणत होते, त्या पद्धतीने बांगलादेश युद्ध सुद्धा थांबवावे अशी टिप्पणी केली. बांगलादेशमध्ये आज जे काही घडत आहे ती सर्वसामान्य माणसाची प्रतिक्रिया असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.
बांगलादेशमध्ये आज जे काही घडलं, तो इशारा आपल्या सर्वांसाठी
उद्धव ठाकरे यांनी सांगितले की आज पाकिस्तान बांगलादेश श्रीलंकेमध्ये जी स्थिती झाली आहे यावरून एकच लक्षात येते की जनतेच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये. इस्त्रायलमध्येही हजारो लोक रस्त्यावर उतरले होते. त्यावेळी पंतप्रधानांना घरातून बाहेर पडणं अशक्य झालं होतं. ते पुढे म्हणाले की अशी परिस्थिती आपल्याकडे येऊ नये. बांगलादेशमध्ये आज जे काही घडलं आहे तो इशारा आपल्या सर्वांसाठी असून जनतेचे न्यायालय सर्वोच्च असल्याचे ठाकरे म्हणाले. कोणीच स्वत:ला देवापेक्षा मोठं मानू नये, असा अप्रत्यक्ष टोलाही त्यांनी मोदी यांना लगावला. मोदी यांनी लोकसभा निवडणुकीत देवानेच मला पाठवल्याचे वक्तव्य केले होते.
तर बांगलादेशमधील हिंदूंचे सुद्धा रक्षण करावं
दरम्यान, बांगलादेशमधून परागंदा होण्याची वेळ आल्यानंतर बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना भारतामध्ये आश्रयासाठी आल्या आहेत. शेख हसीना यांना भारत सरकारकडून संरक्षण देण्यात आलं आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना उद्धव ठाकरे यांनी आज शेख हसीना यांना संरक्षण देणार असाल, तर बांगलादेशमधील हिंदूंचे सुद्धा रक्षण करावं अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली.