Farmers Protest | राजकीय अस्तित्व वाचविण्यासाठी विरोधकांचा आंदोलनात सहभाग : रविशंकर प्रसाद
केंद्र सरकारमार्फत लागू करण्यात आलेल्या कृषी कायद्याविरोधात देशात गदारोळ माजल्याचं पाहायला मिळत आहे. शेतकऱ्यांनी दिल्लीला वेढा दिला आहे. तसेच 8 डिसेंबरला देशव्यापी बंदची हाक दिली आहे. शेतकऱ्यांकडून केंद्र सरकारकडे कृषी कायदे मागे घेण्याची मागणी करण्यात येत आहे. तसेच विरोध पक्षांच्या वतीनेही शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यात येत आहे. अशातच केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी शेतकरी आंदोलनात सहभागी झालेल्या विरोधी पक्षांवर निशाणा साधला आहे.
केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी विरोधी पक्षांवर हल्लाबोल करत म्हटलं आहे की, "शेतकरी आंदोलनात सहभागी झालेल्या विरोधी पक्षांची दुहेरी आणि लज्जास्पद वृत्ती समोर आली आहे. रविशंकर प्रसाद पुढे बोलताना म्हणाले की, "हे विरोधी पक्ष आपला राजकीय हेतू साध्य करण्यासाठी आंदोलनात सहभागी झाले आहेत. विरोधी पक्षांचं काम केवळ मोदी सरकारला विरोध करणं एवढंच आहे."
रविशंकर प्रसाद पुढे बोलताना म्हणाले की, "आम्ही विरोधी पक्ष, विशेषतः काँग्रेस, राष्ट्रवादी आणि त्यांच्यासोबत असलेल्या इतर पक्षांच्या लज्जास्पद दुहेरी मानसिकता देशासमोर आणण्यासाठी आलो आहोत. जेव्हा यांचं राजकीय अस्तित्व संपत आलं आहे, त्यावेळी ते वाचवण्यासाठी ते कोणत्याही सरकार विरोधी आंदोलनात सहभागी होत आहेत." रविशंकर प्रसाद म्हणाले की, "जे आम्ही केलं, यूपीए सरकारही तेच करत होती."