पेगसस प्रकरणावरून संसदेत गदारोळ, विरोधक आक्रमक झाल्याने दोन्ही सभागृहांचं कामकाज सुरू होताच स्थगित
नवी दिल्ली: इस्त्रायलच्या कंपनीने तयार केलेल्या स्पायवेअरच्या माध्यमातून देशातील पत्रकार, विरोधी पक्षाचे नेते आणि प्रमुख व्यक्ती यांच्यावर केंद्र सरकारने पाळत ठेवल्याचा आरोप 16 माध्यम समूहांनी एका मालिकेतून केला आहे. त्यानंतर देशात राजकीय रणकंदन सुरु झालं असून संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस या मुद्द्यावरुन गाजण्याची शक्यता आहे. या मुद्द्यावरुन विरोधकांनी आज सकाळी 10 वाजता बैठक बोलावली आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संध्याकाळी सहा वाजता बैठक बोलावली आहे.
केंद्रीय मंत्र्यांवर पाळत
काल पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी देशाचे नवे माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सभागृहाला सांगितलं की, भारत सरकारचा या हेरगिरी प्रकरणात कोणताही हात नाही, अशा प्रकारची हेरगिरी झाली नाही. पण पुढच्या दोन तासांत काही हेरगिरी करण्यात आलेल्या काही लोकांची यादी आली. त्यामध्ये स्वत: अश्विनी वैष्णव आणि प्रल्हाद पटेल यांचीही नावं होती. राहुल गांधी, ममता बॅनर्जी यांचे पुतणे अभिषेक बॅनर्जी आणि प्रशांत किशोर या तिघांच्यावरही पाळत ठेवला असल्याचं सांगण्यात आलं.