Rajiv Satav | आजारी आजीला भेटण्यासाठी राहुल गांधी इटलीला गेले : राजीव सातव
देशातील सर्वात जुना पक्ष असलेल्या काँग्रेसचा आज वर्धापन दिन आहे. परंतु ऐन वर्धापन दिनीच काँग्रेस खासदार राहुल गांधी इटलीला रवाना झाले. त्यांच्या या परदेश दौऱ्यावर भाजप नेत्यांकडून खिल्ली उडवली जात असतानाच आता काँग्रेसच्या नेत्यांनी उत्तर दिलं आहे. राहुल गांधी यांच्या आजी आजारी असल्याने त्यांना भेटण्यासाठी राहुल गांधी इटलीला गेल्याचं काँग्रेस नेते राजीव सातव यांनी सांगितलं. कधीतरी पंतप्रधान मोदींना पत्रकार परिषद घ्यायला सांगा, सगळेच प्रश्न राहुल गांधींना का असा सवालही त्यांनी विचारला. राजीव सातव यांनी 'एबीपी माझा'सोबत साधला, त्यावेळी ते बोलत होते.
महिनाभर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी नुकतीच राष्ट्रपतींची भेट घेतली. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी सत्ताधारी भाजपवर निशाणाही साधला होता. पण, आज काँग्रेसच्या स्थापना दिनाच राहुल गांधी इटलीला गेल्यामुळे त्यांच्या या दौऱ्याची तुफान चर्चा सुरु आहे. त्यातच "राहुल गांधी यांची भारतातील सुट्टी संपली आहे. आता ते इटलीला परत गेले आहेत," असं म्हणत भाजप नेते गिरीराज सिंह यांनी राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला.