Priyanka Gandhi : जनता महागाईने त्रस्त, सरकार जाहिरातीवरील खर्चात व्यस्त : प्रियांका गांधी : Jaipur
Priyanka Gandhi Congress Rally in Jaipur: काँग्रेस महासचिव प्रियांका गांधी-वाड्रा यांनी भाजपच्या नेतृत्वातील केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. देशातील जनता महागाईने त्रस्त आहे. तर, दुसरीकडे केंद्र सरकार जाहिरातींवर खर्च करण्यात व्यस्त असल्याची टीका प्रियांका यांनी केली. जयपूरमध्ये आज काँग्रेसच्यावतीने केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात, वाढत्या महागाईविरोधात 'महागाई हटाओ' रॅलीचे आयोजन केले होते. यावेळी भाषणात प्रियांका यांनी केंद्र सरकार हे निवडक उद्योगपतींसाठी काम करत असल्याचा आरोप केला.
काँग्रेसच्या रॅलीत मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. प्रियांका गांधी यांनी म्हटले की, स्वयंपाकाचा गॅस एक हजार रुपये, खाद्य तेल 200 रुपयांपेक्षा अधिक दरावर मिळलत आहे. पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडत आहे. सर्वसामान्य जनता महागाईने त्रस्त आहे. एक सरकार असते ज्यांना लोकांचे भले करायचे असते. तर, दुसरे सरकार असते ज्यांचा उद्देश्य भ्रष्टाचार आणि जनतेची लूट करण्याचा असतो.
प्रियांका गांधी-वाड्रा यांनी सरकारच्या धोरणावर जोरदार हल्लाबोल करताना म्हटले की, केंद्र सरकार एकाच उद्योगपतींसाठी काम करत आहे. या सरकारमधील मंत्र्याच्या मुलाने गाडीखाली शेतकऱ्यांना चिरडले. त्यांच्या कुटुंबीयांना सरकारकडून न्यायाची अपेक्षा नाही. ते मंत्री अजूनही मंत्रिपदावर आहेत. उत्तर प्रदेश सरकार जाहिरातींवर कोट्यवधी खर्च करत आहे. मात्र, शेतकऱ्यांना खत पुरवठा करू शकत नाही. केंद्रातील सरकार असत्य, लोभी आणि लूट करणारी सरकार असल्याचा आरोप प्रियांका यांनी केला.