Lakhimpur Kheri violence : लखीमपूरच्या आरोपीला वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न : Priyanka Gandhi
Priyanka Gandhi on Farm Laws: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी देशाला उद्देशून केलेल्या भाषणात तीन कृषी कायदे रद्द करण्याची घोषणा केली होती. केंद्र सरकारच्या या निर्णयाचे काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी-वाड्रा यांनी स्वागत केले आहे. केंद्र सरकारने आता लखीमपूर-खीरी येथे भाजप नेत्याच्या गाडीखाली चिरडून ठार झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना न्याय देण्याची मागणी प्रियंका गांधी-वाड्रा यांनी केली आहे.
प्रियंका गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन ही मागणी केली. त्यांनी म्हटले की, गृहराज्य मंत्री अजय मिश्रा टेनी यांचा मुलगा आशिष मिश्रा याने लखीमपूर-खीरीमध्ये शेतकऱ्यांना गाडी खाली चिरडल्याचा आरोप आहे. मात्र, भाजप सरकार आरोपींना वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आरोपींसोबत व्यासपीठावर एकत्र दिसले तर ते शेतकऱ्यांना चिरडणाऱ्यांना संरक्षण देत असल्याचा संदेश लोकांमध्ये लोकांमध्ये जाईल. पंतप्रधानांचा हा निर्णय 700 हून अधिक शहीद शेतकऱ्यांचा अपमान असेल असेही प्रियंका यांनी म्हटले.
पीडित शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना न्याय देण्यासाठी गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी अशी मागणी प्रियंका गांधी यांनी केली. सरकारने आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांविरोधात सुरू असलेले खटले मागे घ्यावेत आणि पीडित कुटुंबीयांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणीही प्रियंका गांधींनी केली.