मेहुल चोक्सीला डोमिनिका हायकोर्टाकडून जामीन मंजूर, उपचारासाठी अँटिग्वाला जाण्याची परवानगी
नवी दिल्ली : 14 हजार कोटींच्या गैरव्यवहारातील फरार आरोपी मेहुल चोक्सीला सोमवारी मोठा दिलासा मिळाला आहे. डॉमिनिका कोर्टाने उपचारासाठी अँटिग्वाला जाण्याची परवानगी दिली आहे. कोर्टाने 10 हजार EC डॉलर जामीनासाठी भरण्यास सांगितले आहे. तसेच चोक्सीला अँटिग्वातील आपला पत्ता आणि उपचार करणाऱ्या डॉक्टरांची माहिती देण्यास सांगितले आहे. तसेच कोर्टाच्या सुनावणीसाठी येण्याची देखील अट ठेवली आहे.
दरम्यान डॉमिनिकामध्ये चोक्सी विरुद्ध चाललेल्या खटल्याला स्थगती देण्यात आली आहे. मेहुल चोक्सी पुढील दोन तीन दिवसात डॉमिनिकावरून अँटिग्वाला जाऊ शकतात. पंजाब नॅशनल बँकेची 13500 कोटींची फसवणूक करणारा मेहुल चोक्सी अँटिगा आणि बार्बुडा या कॅरेबियन बेटावरुन फरार झाला होता. भारतातून फरार झाल्यानंतर गेली काही वर्ष कॅरिबियन बेटांवरच्या अँटिग्वामध्ये मेहुल चोक्सी वास्तव्याला होता. याच बेटावरील डॉमिनिकामधून मेहुल चोकसीला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. 62 वर्षीय फरार मेहुल चोक्सी ॲंटिग्वाच्या नागरिकत्वाच्या आधारे 2017 पासून तिथे लपून बसला होता. आता त्याचं भारताकडे सोपवण्याची तयारी ॲंटिग्वा सरकारने केली.
आपल्यावरील आरोप खोटे, निराधार आणि राजकीय प्रयत्नांमुळे प्रेरित आहेत, चोक्सीने याआधी म्हटलं होतं. पीएनबी घोटाळ्याप्रकरणी चोक्सीचा पुतण्या नीरव मोदीला अटक केली आहे. काकाप्रमाणेच नीरव मोदीनेही 2018 मध्ये भारतातून पळ काढला होता आणि सध्या तो युनायटेड किंग्डममध्ये आहे. नीरव मोदी अद्यापही या प्रत्यार्पणाच्या आदेशाला यूके उच्च न्यायालयासमोर आव्हान देऊ शकतो. त्यामुळे पुतण्याच्या आधी काका चोक्सीला भारतात आणलं तर तो आर्थर रोडच्या व्हीआयपी बॅरेक 12 च्या विशेष सेलमध्ये राहणार हे निश्चित.