Ramesh Jarkiholi | बेळगावचे पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांचा अश्लील व्हिडीओ व्हायरल
बेळगाव : महाराष्ट्रात एकीकडे शिवसेनेचे मंत्री संजय राठोडला पूजा चव्हाण प्रकरणात राजीनामा द्यावा लागला असताना दुसऱ्या बाजूला कर्नाटकच्या भाजपच्या मंत्र्याचा एका तरुणीसोबत लगट करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यामुळे कर्नाटकात एकच खळबळ उडाली आहे.
बेळगावचे पालकमंत्री आणि कर्नाटक राज्याचे जलसंपदामंत्री रमेश जारकीहोळी यांच्या आक्षेपार्ह व्हिडीओ क्लिप्स व्हायरल झाल्या आहेत. नोकरीच्या निमित्ताने जवळीक साधून युवतीवर अत्याचार केल्याची टीका त्यांच्यावर होत आहे. रमेश जारकीहोळी यांनी नोकरीच्या आमिषाने युवतीवर अत्याचार केल्याचा आरोप नागरी हक्क संघर्ष समितीचे अध्यक्ष दिनेश कलहळ्ळी यांनी केला आहे. दिनेश कलहळ्ळी यांनी पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांच्या अनैतिक संबंधाची सीडी सार्वजनिक केली आहे.
दिनेश कलहळ्ळी यांनी आज शहराचे पोलीस आयुक्त कमल पंत यांची भेट घेऊन या प्रकरणी सखोल चौकशीची मागणी केली आहे. आपल्या तक्रारीत दिनेश कलहळ्ळी यांनी म्हटलं आहे की, "रमेश जारकीहोळी यांनी केपीटीसीएलमध्ये नोकरी देण्याच्या बहाण्याने वारंवार 25 वर्षीय तरुणीचं लैंगिक शोषण केलं."
परंतु नंतर तिला नोकरी देण्यास नकार दिल्याचं समजल्यानंतर तरुणीने त्या दोघांमधील वैयक्तिक क्षण रेकॉर्ड केले. ही बाब समजल्याच रमेश जारकीहोळी यांनी तिला गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकी दिली, असंही दिनेश कलहळ्ळी यांनी तक्रारीत म्हटलं आहे. आज व्हायरल झालेला व्हिडीओ महिनाभरापूर्वीचा असल्याचं कळतं. हा प्रकार बंगळुरुच्या कबॉन पार्क पोलीस स्टेशनच्या हद्दीतील हॉटेलमध्ये घडला. त्यानंतर पोलीस आयुक्तांनी कलहळ्ळी यांना कबॉन पार्क पोलिसात तक्रार दाखल करण्यास सांगितलं.
तरुणीच्या कुटुंबीयांनी दिनेश कलहळ्ळी यांच्याकडे गाऱ्हाणं मांडल्यानंतर ते पोलिसांत पोहोचले. यावेळी तरुणी आणि तिच्या कुटुंबीयांच्या जीवाला धोका असल्याने सुरक्षा द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.
हे संवेदनशील प्रकरण असल्याने गुन्हा दाखल करण्यापूर्वी आम्ही अंतर्गत चौकशी करु, असं उत्तर पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं.
दरम्यान रमेश जारकीहोळी हे कर्नाटकातील मोठे राजकीय प्रस्थ आहे. पूर्वी काँग्रेसचे नेते असलेल्या जरकीहोळी यांचा कर्नाटकात भाजपची सत्ता आणण्यात सिंहाचा वाटा आहे. काँग्रेसमधून बंडखोरी करत त्यांनी भाजपला पाठिंबा दिला होता. परंतु आता जारकीहोळी यांच्या सीडीमुळे कर्नाटकातील विरोधीपक्ष आक्रमक होण्याची शक्यता आहे.