Kappira Srinivasulu : चंद्राबाबू मुख्यमंत्री होईपर्यंत अर्ध मुंडन आणि अर्धी मिशी ठेवणार, TDP नेत्याची अजब शपथ
TDP leader keep moustache half-shaved head : राजकारणात नेते, कार्यकर्त्यांकडून शपथ, चाणक्यप्रतिज्ञा केली जाते. त्यातील काहींच्या शपथा या लक्षवेधी असतात. आंध्र प्रदेशात तेलगू देसम पक्षाचे नेते चंद्राबाबू नायडू यांनी सत्ता येईपर्यंत विधानसभेत पाऊल न ठेवण्याची प्रतिज्ञा केली आहे. चंद्राबाबू नायडू यांची ही घोषणा चर्चेत असताना त्यांच्या पक्षाचे नेते कप्पेरा श्रीनिवासुलू यांनी अजब शपथ घेतली आहे. चंद्राबाबू सत्तेवर येईपर्यंत अर्ध मुंडण आणि अर्धी मिशी ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले.
आंध्र प्रदेशमधील नेल्लोरमध्ये नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत तेलगू देसम पक्षाचा मोठा पराभव झाला असून वायएसआर काँग्रेसचा विजय झाला आहे. तेलगू देसम पक्षाच्या पराभवामुळे पक्षाच्या समर्थकांना मोठा धक्का बसला आहे. त्या पार्श्वभूमीवर कप्पेरा श्रीनिवासुलू यांनी अजब शपथ घेतली आहे. तेलगू देसम पक्षाचे अध्यक्ष चंद्राबाबू नायडू हे सत्तेवर येईपर्यंत अर्ध मुंडण आणि अर्धी मिशी ठेवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी आपल्या प्रतिज्ञेसाठी त्यांनी आपले अर्ध मुंडण केले असून अर्धी मिशी ठेवली आहे.
कप्पेरा श्रीनिवासुलू फक्त एवढ्यावरच थांबले नाहीत. तर, त्यांनी चंद्राबाबू नायडू यांच्या विजयासाठी आणि विद्यमाम मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या पराभवाचे आवाहन करणारा संदेश असलेला एक पाटीही गळ्यात अडकवली आहे.
कप्पेरा श्रीनिवासुलू यांनी म्हटले की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत वायएसआर काँग्रेसने मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार केला आहे. मंत्री अनिल कुमार आणि त्यांच्या समर्थकांनी नेल्लोरमधील निवडणुका जिंकण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पैसे वाटले आहेत.