Gulshan Kumar Murder : गुलशन कुमार हत्येप्रकरणी आरोपीची जन्मठेपेची शिक्षा हायकोर्टाकडून कायम

मुंबई : नव्वदच्या दशकात उदयास आलेल्या टी-सीरीज कंपनीचे मालक आणि 'कॅसेटकिंग' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलशन कुमार यांच्या हत्याकांड प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयानं आपला प्रलंबित निकाल दिला आहे. या प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा झालेल्या अब्दुल रौफ उर्फ दाऊद मर्चंट या मारेकऱ्यानं मुंबई सत्र न्यायालयाच्या निकालाला हायकोर्टात दिलेलं आव्हान फेटाळून लावण्यात आलंय. मारेकरी अब्दुल रौफ कोणत्याही दयेच्या लायक नाही असं सांगत न्यायालयानं त्याच्या जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवली आहे.

शिक्षेदरम्यान मिळालेली पॅरोल तोडून पळून जात आरोपीनं आपल्या गुन्हेगारी कारवाया सुरुच ठेवल्या. त्यानंतर 2009 मध्ये पळून गेलेल्या रौफला साल 2016 मध्ये पुन्हा अटक झाली. त्यामुळे आरोपी कोणत्याही माफीच्या लायक नाही असं हायकोर्टानं स्पष्ट केलं. न्यायमूर्ती साधना जाधव आणि न्यायमूर्ती नितीन बोरकर यांच्या खंडपीठानं हा निकाल जाहीर केला.

याप्रकरणी पुराव्यांअभावी कोर्टानं निर्दोष मुक्त केलेल्या काही आरोपींविरोधात राज्य सरकारनंही हायकोर्टात आव्हान दिलं होतं. निर्दोषमुक्त झालेल्या आरोपींमध्ये 'टीप्स' कंपनीचे मालक रमेश तौरानी यांचाही समावेश आहे. तौरानी यांना दिलासा देत हायकोर्टानं त्याचं निर्दोषत्व कायम ठेवत त्यांच्या विरोधातील राज्य सरकारचं अपील फेटाळून लावलं. तर अन्य निर्दोष आरोपी अब्दुल मर्चंट विरोधातील अपील हायकोर्टानं अंशत: स्विकारलं, या आरोपीलाही जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली असून आठवड्याभरात मुंबई पोलिसांना शरण येण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. 

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीमचा हस्तक असलेल्या अब्दुल रौफला जानेवारी 2001 मध्ये भारत बांग्लादेश सीमेवर बीएसएफच्या उपस्थितीत मुंबई क्राईम ब्रांचच्या स्वाधीन करण्यात आलं होतं. त्यानंतर पोलिसांनी त्याला कोलकात्यामध्ये अटक केली होती. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola