Goa Coronavirus : गोव्यात सोमवारची रात्र ठरली काळरात्र! 4 तासात मृत्यूतांडव, 26 रुग्णांचा मृत्यू
पणजी : गोव्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात मृत्यूतांडव पाहायला मिळालं. अवघ्या चार तासात 26 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. मृत्यूच्या नेमक्या कारणाचा तपास करण्यासाठी गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी मुंबई उच्च न्यायालयामार्फत चौकशी करण्याची मागणी केली आहे. या रुग्णांचा मृत्यू रात्री दोन ते सकाळी सहा दरम्यान झाला आहे. तर ऑक्सिजन अभावी या रुग्णांचा मृत्यू झाल्याचं म्हटलं जात आहे.
जीएमसीएचचा दौरा केल्यानंतर गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी म्हटलं होतं की, "मेडिकल ऑक्सिजनचा उपलब्धता आणि जीएमसीएचमधील कोविड-19 वॉर्डपर्यंत याच्या पुरवठ्यामधील अंतरामुळे रुग्णांना काही अडचणी आल्या." राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा नाही, यावरही त्यांनी जोर दिला. तर दुसरीकडे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी मात्र सोमवारी (10 मे) पत्रकारांशी संवाद साधताना जीएमसीएचमध्ये ऑक्सिजनचा अभाव असल्याचं मान्य केलं होतं.
मुख्यमंत्र्यांच्या जीएमसीएचमधील दौऱ्यानंतर आरोग्यमंत्र्यांनी म्हटलं की, "रुग्णांच्या मृत्यूचं नेमकं कारण जाणून घेण्यासाठी उच्च न्यायालयामार्फत चौकशी व्हायला हवी. उच्च न्यायालयायने या प्रकरणात हस्तक्षेप करुन जीएमसीएचमधील ऑक्सिजनच्या पुरवठ्याबाबत श्वेतपत्रिका तयार करण्यास सांगावी, जेणेकरुन काही गोष्टींमध्ये सुधारणा करण्यास मदत मिळेल."
"शासकीय रुग्णालयात मेडिकल ऑक्सिजनच्या 1200 मोठ्या सिलेंडरची आवश्यकता होती. पण केवळ 400 सिलेंडरचाच पुरवठा झाला. जर मेडिकल ऑक्सिजनचा पुरवठा अपुरा असेल तर तो दूर करण्यासाठी चर्चा करायला हवी," असं विश्वजीत राणे यांनी सोमवारी म्हटलं होतं.
"राज्य सरकारने जीएमसीएचमध्ये कोविड-19 च्या उपचारांवर देखरेख ठेवण्यासाठी स्थापन केलेल्या नोडल अधिकारिऱ्यांच्या तीन सदस्यीय समितीने मुख्यमंत्र्यांना याबाबत माहिती द्यायला हवी," असंही विश्वजीत राणे यांनी म्हटलं.
दरम्यान अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, 10 मेपर्यंतच्या आकडेवारीनुसार, गोव्यात कोविड-19 चे एकूण 1,21,650 कोरोनाबाधित रुग्ण आहेत. तर 1,729 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.