EXCLUSIVE | चीनच्या कुरापती सुरुच; भारत-चीन नियंत्रण रेषेवर चीनचे तळ असल्याची दृश्य समोर
लडाख : भारत आणि चीन या दोन्ही राष्ट्रांमध्ये तणावाची परिस्थिती उदभवलेली असतानाच आता आणखी एक खळबळजनक वृत्त समोर आली आहे. या वृत्तामुळं दोन्ही राष्ट्रांमध्ये असणाऱ्या तणावाच्या परिस्थितीत आणखी भर पडण्याची चिन्हं आहेत. एलएसी अर्थात लाईन ऑफ अॅक्च्युअल कंट्रोलवर चीनच्या (PLA) सैन्यानं तळ ठोकले आहेत.
चीननं नियंत्रण रेषेवर तळ ठोकल्याची दृश्य नुकतीच समोर आली आहेत. ज्यामध्ये पँगाँग त्सो लेकच्या दक्षिणेला कैलास पर्वतरांगांच्या तळाशी कर खोऱ्यात चीनचं तळ नजरेस पडत आहे. हाती आलेल्या छायातित्रांमध्ये हे स्पष्ट होत आहे की, चुशूलमध्ये नेमका भारत आणि चीनच्या सैन्यांच संघर्ष का सुरु आहे.
29-30 ऑगस्टला रात्री प्री- अॅम्पटीव्ह ऑपरेशनअंतर्गत भारतीय सैन्यानं चीनला सडेतोड उत्तर दिलं होतं. त्यावेळी या भागातील सॅटेलाईट छायाचित्रंच हाती आली होती. पण, आता मूळ स्वरुपातील छायाचित्र समोर आल्यामुळं तेथील चित्र स्पष्ट होत आहे. या छायाचित्रामध्ये पँगाँग त्सो लेकही स्पष्टपणे दिसत आहे. ज्यामुळं हेच सिद्ध होत आहे, की भारतीय भूखंडावर पुन्हा एकदा चीनची घुसखोरी आणि नियंत्रण रेषा भागातील कुरापती सुरुच आहेत.