Book Launch Justice Dilip Bhosale : माजी. न्या. दिलीप भोसलेंच्या चरित्रग्रंथाचं प्रकाशन

Book Launch Justice Dilip Bhosale : माजी. न्या. दिलीप भोसलेंच्या चरित्रग्रंथाचं प्रकाशन
अलाहाबाद उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायमूर्ती दिलीप बाबासाहेब भोसले यांच्या'द बेनेवोलंट जज' या चरित्रग्रंथाचं आज मुंबईत प्रकाशन करण्यात आलं.सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई,न्यायमूर्ती पंकज मित्तल, न्यायमूर्ती विक्रम नाथ,न्यायमूर्ती प्रसन्न भालचंद्र वराळे,मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्रकुमार उपाध्याय यांच्या हस्ते हे पुस्तक प्रकाशन झालं. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांनी यावेळी बोलताना, न्यायमूर्ती भोसले यांच्या कठोर परिश्रम,समर्पण भाव, माणुसकी,नम्रता अशा गुणांचं कौतुक केलं आणि उमेदीतल्या वकिलांसाठी ते आदर्श उदाहरण असल्याचं सांगितलं.सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांचा खास संदेशही भोसले यांच्या या चरित्रग्रंथामध्ये आहे, तो यावेळी वाचून दाखवण्यात आला.भूषण गवई आणि विक्रम नाथ यांची या चरित्रग्रंथाला प्रस्तावना आहे.यावेळी बोलताना माजी न्यायमूर्ती दिलीप भोसले यांनी आपल्या प्रदीर्घ न्यायालयीन सेवेतल्या आठवणींना उजाळा दिला. न्यायमूर्ती अशोक भूषण, न्यायमूर्ती कृष्ण मुरारी, म.प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश रवी विजयकुमार मलीमथ यांच्यासह विविध उच्च न्यायालयाचे न्यायाधीश,वकील यावेळी हजर होते. न्यायमूर्ती भोसले यांची मुलगी आणि मुंबई उच्च न्यायालयातील वकील नेहा भोसले, मुलगा वकील करण भोसले हेही यावेळी उपस्थित होते. न्यायाधीश कुणाल वेपा यांनी हे माजी न्यायमूर्ती भोसले यांचं चरित्र लिहलंय.मुंबईतल्या हॉटेल ताजमहल पॅलेसमध्ये हा कार्यक्रम पार पडला. ज्येष्ठ वकील राजन जयकर यांनी या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं. माजी न्यायमूर्ती दिलीप भोसले हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री बाबासाहेब भोसले यांचे सूपुत्र आहेत. त्यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयात मुख्य न्यायाधीश म्हणून काम पाहण्यापूर्वी हैदराबाद,कर्नाटक आणि मुंबई उच्च न्यायालयात काम पाहिलंय. १९८० ते २०१८ या अशी ३८ वर्षांची त्यांची न्यायालयीन कारकिर्द होती.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola