Bird Flu Death : बर्ड फ्ल्यूमुळे देशात पहिला मृत्यू
Bird Flu Death : कोरोना महामारीची दुसरी लाट अद्याप सुरुच आहे. अशातच यंदा देशात एविएन इन्फ्लुएन्जा H5N1 म्हणजेच, बर्ड फ्लूची लागण झालेल्या पहिल्या रुग्णाचा मृत्यू झाला आहे. राजधानी दिल्लीतील एम्स रुग्णालयात 11 वर्षाच्या मुलाचा एवियन इन्फ्लूएंजामुळे मृत्यू झाला आहे. रुग्णाच्या मृत्यूनंतर त्याच्या संपर्कात आलेल्या रुग्णालयातील नर्स आणि डॉक्टरांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलं आहे.
दिल्लीतील एम्स रुग्णालयाच्या प्रशासनानं दिलेल्या माहितीनुसार, 11 वर्षांच्या या मुलाला 2 जुलै रोजी एम्समध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर या मुलाला बर्ड फ्लूची लागण झाल्याचं निष्पन्न झालं होतं. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत मुलगा हरियाणामधील होता. एनसीडीसीच्या एका पथकाला या गावात पाठवण्यात आलं आहे.
या एविएन इन्फ्लुएन्जा H5N1ची लागण झालेल्या रुग्णाच्या मृत्यूनंतर त्याच्या संपर्कात आलेल्या सर्व कर्मचाऱ्यांनाही आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलं आहे. याच वर्षाच्या सुरुवातीला देशातील अनेक राज्यांत कोरोनासोबतच बर्ड फ्लूचाही प्रादुर्भाव दिसून आला होता. अनेक ठिकाणी बर्ड फ्लूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अनेक कोंबड्या ठार करण्यात आल्या होत्या.