Belgaum Municipal Corporation Election : मतदानाला सुरुवात, सकाळी 9 पर्यंत 5.39 टक्के मतदान
Belgaum Municipal Corporation Election : दोन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या बेळगाव महानगरपालिका निवडणुकांसाठी आज मतदान पार पडत आहे. आज 3 सप्टेंबर रोजी मतदान होणार असून 6 सप्टेंबर रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर केला जाणार आहे. मराठी भाषिकांनी बेळगावचा गड राखण्याची तयारी सुरु केली आहे. बेळगाव महानगरपालिका निवडणुकीसाठी शुक्रवारी (आज) सकाळी सात ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मतदान होणार आहे. मतदानासाठी संपूर्ण तयारी पूर्ण झाली असून निवडणुकीसाठी नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांना मतदान यंत्रे आणि आवश्यक साहित्य बेळगावातील बीके मॉडल हायस्कूल येथे वितरित करण्यात आलं आहे.
निवडणुकीच्या मतदानाची प्रक्रिया शुक्रवारी सकाळी 7 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत पार पडणार असल्यामुळे जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. या निवडणुकीसाठी यावेळी पहिल्यांदाच ईव्हीएम मशीनचा वापर केला जाणार आहे. निवडणुकीसाठी महापालिकेसह जिल्हा प्रशासनाकडून 1,826 निवडणूक कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.
बेळगाव महानगरपालिका निवडणूकीत 58 प्रभागांसाठी मतदान होणार असून एकूण 385 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. भाजप 55,काँग्रेस 45, महाराष्ट्र एकीकरण समिती 21, जे डी एस 11, आम आदमी 37, एआयएमआयएम 7, अन्य दोन आणि अपक्ष 217 असे उमेदवार निवडणूक लढवत आहेत. 428364 इतके मतदार असून त्यामध्ये 213536 पुरुष आणि 214834 महिला मतदार आहेत. मतदानासाठी 415 मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. निवडणुकीसाठी 1828 कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर चार कर्मचारी आणि एक पोलिसाची नियुक्ती करण्यात आली आहे. शहर पोलीस आयुक्तालयातील पोलीस अधिकारी आणि पोलीस यांच्या व्यतिरिक्त सहा राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्या तैनात करण्यात येणार आहेत. 300 होमगार्ड देखील बंदोबस्तासाठी नेमण्यात आले आहेत.