मुलाच्या लग्नाचा शाही सोहळा धनंजय महाडिकांना पडला महागात, महाडिकांविरोधात हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा
पुणे पोलीस आणि पुणे महापालिका माजी खासदार धनंजय महाडिक आणि त्यांच्या पाहुण्यांवर कारवाई करणार का? हा सवाल उपस्थित होण्यामागचं कारण म्हणजे, मुख्यमंत्र्यांच्या आवाहानाला हरताळ फासत महाडिकांच्या मुलाच्या लग्नात जमलेली गर्दी.महाराष्ट्र लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर असताना धनंजय महाडिकांचे पुत्र पृथ्वीराज यांचा मगरपट्टा परिसरातल्या लॉन्सवर शाही विवाह सोहळा पार पडला. या सोहळ्यातल्या गर्दीनं सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवला. विशेष म्हणजे काल संध्याकाळी सात वाजता मुख्यमंत्र्यांनी जनतेशी संवाद साधताना गर्दी टाळा, मास्क घाला अन्यथा लॉकडाऊन अटळ आहे असा इशारा दिला. मुख्यमंत्र्यांनी हा इशारा देऊन तासही उलटला नाही तोच त्याला महाडिकांच्या मुलांच्या लग्नात पायदळी तुडवण्यात आलं. अनेक जण विनामास्क वावरत होते.. धक्कादायक बाब म्हणजे सर्वपक्षीय दिग्गज नेत्यांनी या लग्न सोहळ्याला हजेरी लावली. त्यातल्या अनेकांच्या चेहऱ्यावरुन मास्क गायब झाला होता.