Ram Mandir | राम मंदिराच्या भूमिपूजनाची तारीख ठरली, या दोन तारखांचा प्रस्ताव पंतप्रधान कार्यालयाकडे
देशाच्या राजकारणात गेली तीन दशकं वादळ निर्माण करणाऱ्या राम मंदिर निर्मितीची प्रत्यक्ष अंमलबजावणी होताना आता दिसत आहे. अयोध्येतल्या राम मंदिराच्या निर्मितीचं काम तीन किंवा पाच ऑगस्टला सुरू होऊ शकतं. आज अयोध्येमध्ये मंदिर निर्माण ट्रस्टची एक महत्वाची बैठक पार पडली, त्यानंतर दोन वेगवेगळ्या तारखांचा प्रस्ताव भूमिपूजनासाठी पंतप्रधान कार्यालयाकडे पाठवला गेला आहे. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन व्हावं अशी इच्छा राम जन्मभूमी न्यासनेही व्यक्त केली होती.
फेब्रुवारी महिन्यातच खरंतर या ट्रस्टची बैठक होऊन रामनवमीपर्यंत काम सुरू होणार होतं मात्र कोरोनाच्या संकटामुळे ते लांबणीवर पडलं. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आता मंदिर निर्मितीच्या कामाला सुरुवात होईल. कोर्टाच्या आदेशानुसार स्थापन झालेल्या राम मंदिर निर्माण ट्रस्टमधे एकूण पंधरा सदस्य आहेत त्यापैकी 12 सदस्यांनी आज अयोध्येतल्या या बैठकीला प्रत्यक्ष हजेरी लावली तर तीन सदस्य व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर होते.