Gosikhurd Dam Bhandara : जागतिक जलतरण पर्यटन प्रकल्पातून दहा हजार बेरोजगारांना मिळणार रोजगार
Gosikhurd Dam Bhandara : जागतिक जलतरण पर्यटन प्रकल्पातून दहा हजार बेरोजगारांना मिळणार रोजगार वैनगंगेच्या विस्तीर्ण पात्रावर असलेल्या गोसीखुर्द धरणाच्या बॅक वॉटरवर जागतिक दर्जाचं पर्यटन प्रकल्प होत आहे. भंडारा आणि नागपूर जिल्ह्याच्या सीमेवर हा प्रकल्प होत असल्याने दोन्ही जिल्ह्यातील सुमारे दहा हजारापेक्षा अधिक बेरोजगारांना येथे रोजगार उपलब्ध होणार आहे. या प्रकल्पासाठी १०२ कोटींचा पहिला टप्पा प्राप्त झाला असून त्याचं भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज होत आहे. वैनगंगेच्या तीरावर होत असलेल्या भूमिपूजन सोहळा स्थळावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रशांत देसाई यांनी..
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आज भंडारा जिल्ह्याच्या (Bhandara News) दौऱ्यावर आहेत. दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास वैनगंगा नदीवर होत असलेल्या जागतिक दर्जाच्या जल पर्यटन प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचं आज त्यांच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे. रेल्वे मैदानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भव्य जाहीर सभा होत आहे. यावेळी राज्याचे उद्योग मंत्री उदय सावंत हे सुद्धा उपस्थित राहणार आहे. भंडाऱ्याचे अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या माध्यमातून या सभेचं आणि या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योगमंत्री सावंत यांच्या स्वागताचे भंडारा शहरामध्ये ठिकठिकाणी मोठे मोठे बॅनर आणि होर्डिंग लावण्यात आलेली आहे. तर या कार्यक्रमाच्या अनुषंगाने जोरदार तयारी करण्यात आली आहे. वैनगंगा नदीवर होत असलेल्या जागतिक दर्जाच्या जल पर्यटन प्रकल्प जिल्ह्याच्या पर्यटन क्षेत्राला उभारी देणारा असून अनेक रोजगाराच्या संधी ही निर्माण करणारा ठरणार आहे. त्यामुळे या महत्वकांशी, प्रकल्पाची साऱ्यांनाच प्रतीक्षा लागली आहे.