Bhandara Dhan Loss : अवकाळीने भंडाऱ्याला झोडपलं; शेतीतील धानाचं नुकसान
Bhandara Dhan Loss : अवकाळीने भंडाऱ्याला झोडपलं; शेतीतील धानाचं नुकसान भंडारा जिल्ह्यात सध्या धान खरेदी हाच बहुचर्चित विषय ठरला आहे. यावर्षी 256 धान खरेदी केंद्र सुरू करण्याचं उद्दिष्ट पणन कार्यालयानं ठेवलं मात्र, त्यातील जेमतेम केवळ 60 केंद्रांवर खरेदी सुरू झाली आहे. केंद्र सुरू नं झाल्यानं धान खरेदीसाठी होत असलेला पणन विभागाचा वेळकाढूपणामुळं धान उत्पादकांचा जीव टांगणीला आणणारा ठरला आहे. जिल्ह्यातील खरेदी केद्रांना नवनवीन अटीशर्तींच्या कारणावरून खरेदीची परवानगी देण्यास विलंब होत आहे. 20 नोव्हेंबरला भंडाऱ्यात पार पडलेल्या शासन आपल्या दारी या कार्यक्रमात मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती होती. त्यात जिल्ह्यातील धान खरेदी केंद्र तातडीनं सुरू करून शेतकऱ्यांचा धान खरेदी करण्याचे निर्देश दिलेत. मात्र, कार्यक्रमाच्या वेळेस सुरू असलेल्या 40 केंद्रात आता आठ दिवसांनंतर केवळ 20 अधिकचे केंद्रांची भर पडली असून आतापर्यंत 60 केंद्र सुरू झालेले आहेत. त्यामुळं शेतकरी अडचणीत सापडला आहे. अशात आता दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण असून अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तविली असल्यानं शेकडो शेतकरी चिंतातुर झाला आहे. धान खरेदी केंद्र सुरू होण्याच्या प्रतीक्षेत अनेक शेतकऱ्यांचा धान शेतात उघड्यावर तर कुणाचा घरी जागा नसल्यानं धान खरेदी केंद्राच्या आवारात ठेवण्यात आला आहे. मात्र, आता अवकाळी पाऊस आल्यास शेतकऱ्यांच्या स्वप्नांवर पाणी फेरल्या जाणार आहे.