हर्सूलच्या कारागृहात बनावट जामीनपत्र; आरोपींकडे बीड न्यायालयाचे बनावट शिक्के
औरंगाबाद : औरंगाबादच्या हर्सूल मध्यवर्ती कारागृहात बोगस जामिनपत्र दाखवून पळून जाण्याचा कट उद्ध्वस्त करण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलिसांना वेळीच संशय आल्यानं हा प्रकार उघड झाला आहे. मोक्काच्या दोन कैद्यांचे जामिनपत्र जेलच्या लेटर बॉक्समध्ये पोलिसांना आढळून आले. संशय आल्यानं पोलिसांनी त्या जामिनपत्राची शहानिशा करण्यासाठी बीडच्या कोर्टाला पत्र पाठवले. त्यात आम्ही जामिन दिलाच नसल्याचं कोर्टानं सांगितले. या प्रकरणाची चौकशी सुरु असतांना एका कैद्याला कोर्टात हजेरीसाठी नेत असताना त्याच्याजवळही बोगस जामिनपत्र आढळून आले. त्यात त्यानं जेलमधील एका कैद्यानंच ते बाहेरून बनवून आणून दिलं असल्याचं सांगितलं आणि खळबळ उडाली.