VIDEO | सहा लाखांसाठी व्यावसायिकाची हत्या, घटनेच्या निषेधार्थ दुकानं बंद | नाशिक | एबीपी माझा
६ लाख रुपयांची लूट करत एका व्यावसायिकाची हत्या केल्याची धक्कादायक घटना नाशिकमध्ये घडलीय. नाशिकच्या इंदिरानगर या उच्चभ्रू परिसरात अविनाश शिंदे हे व्यावसायिक गणाधीराज अपार्टमेंटमध्ये सुपर ग्राहक बाजार नावाचे मिनी सुपर मार्केट चालवतात. याच अपार्टमेंटमध्ये ते वास्तव्यास होते. मंगळवारी रात्री १० वाजेच्या सुमारास दुकान बंद करत पैशांची बॅग घेऊन ते आपल्या ३ वर्षाच्या मुलासह घराकडे पायी जात होते आणि अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये ते पोहोचताच त्यांच्यावर २ जणांनी पाठीमागून येत अविनाश यांच्या हातातील बॅग हिसकण्याचा प्रयत्न केला. त्याला विरोध करताच अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्या छातीवर धारदार शस्त्राने वार केले. या घटनेत रक्ताच्या थारोळ्यात गंभीर जखमी अवस्थेत पडलेल्या अविनाश यांना स्थानिक नागरिकांनी उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता उपचार सुरु होण्यापूर्वीच त्यांनी श्वास सोडला होता.. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून परिसरातील व्यावसायिकांमध्ये घबराट पसरलीय. अविनाश शिंदे यांच्या हत्येच्या निषेधार्थ व्यवसायिकांनी आज आपली दुकाने बंद ठेवली आहेत.