डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती : महामानवाला वंदन करण्यासाठी नागपुरातील दीक्षभूमीत लाखोंच्या संख्येने भीमसागर
Continues below advertisement
भारतीय राज्यधटनेचे शिल्पकार, भारतरत्न, समता लढ्याचे प्रेरणास्त्रोत, दलितांचा आधारस्तंभ असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर, यांची आज १२७वी जयंती आहे. १८९१ साली मध्यप्रदेशातील मेहूमध्ये त्यांचा जन्म झाला. भारतातील जातीअंताच्या लढ्याला आकार आणि दिशा देण्याचं मोठं काम डॉ. आंबेडकरांनी केलं. त्याच वेळी जागतिक पातळीवर शोषण मुक्ती आणि समतेसाठीच्या लढ्यांमध्येही आंबेडकर प्रेरणादायी ठरले. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार, सिद्धांत आणि प्रत्यक्ष चळवळ यातून त्यांचं योगदान मौल्यवान ठरलं. त्यांचं विचारधन आणि प्रत्यक्ष चळवळींमधला त्यांचा सहभाग, यातून ते सर्वांचेच प्रेरणास्त्रोत बनले. बाबासाहेब आंबेडकरांची जन्मभूमी मेहू असली तरी मुंबई आणि नागपूर त्यांनी आपली कर्मभूमी मानली. म्हणूनच १९५६ मध्ये त्यांनी नागपुरात बौद्ध धम्म स्वीकारला, आणि लक्षावधी दलितांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली. म्हणूनच आज नागपुरातील ही भूमी दिक्षाभूमी नावानं ओळखली जाते. त्यामुळे आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त लाखोंच्या संख्येनं भीमबांधव नागपुरातील दिक्षाभूमीत येत असतात. तर मुंबईतल्या चैत्यभूमीवर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाला आदरांजली वाहण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यपाल सी. विद्यासागर राव उपस्थित राहतील. याशिवाय मेहू या आंबेडकरांच्या जन्मस्थळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आंबेडकरांच्या स्मारकाला आदरांजली वाहतील.
Continues below advertisement