मुंबई : एलफिन्स्टन फूट ओव्हर ब्रिजचं बांधकाम भारतीय सैन्य करणार
मुंबईतील एलफिन्स्टन स्थानकावरील फूट ओव्हर ब्रीज मिलिटरी बांधणार असल्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रेल्वेमंत्री पियुष गोयल आज एलफिन्स्टन स्थानकाची पाहणी करायला येणार आहेत, त्यावेळी ही घोषणा केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
भारतीय सैन्यातील इंजिनीअरिंग विंग आपत्कालीन परिस्थितीत अशाप्रकारचे ब्रीज बांधते. कमीत कमी वेळात मिलिटरीकडून हा ब्रीज बांधला जाईल.
यापूर्वी राष्ट्रकुल स्पर्धेवेळी दिल्लीत पूल कोसळल्यानंतर मिलिटरीने तो लवकरात लवकर बांधून दिला होता. त्यानंतर मुंबईत पहिल्यांदाच अशाप्रकारे ब्रीज बांधला जाणार आहे.
भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी या संदर्भात रेल्वेमंत्री पियुष गोयल यांना निवेदन लिहिलं आहे. एलफिन्स्टन, दादर, बोरीवली, मुलुंड, ठाणे यासारख्या स्टेशनवर, फूट ओव्हर ब्रीज वापरणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षेसाठी एकदाच पण कायमस्वरुपी उपाययोजना करा, अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे.