मुंबई | नेस वाडिया आणि प्रीती झिंटाला हायकोर्टात हजर राहण्याचे निर्देश
प्रीती झिंटा हिनं ४ वर्षांपूर्वी उद्योजक मित्र नेस वाडीया याच्या विरोधात विनयभंगाची तक्रार केली होती. याप्रकरणी जर नेस वाडीया माफी मागण्यास तयार असेल तर, आपण केस मागे घेऊ.असं बॉलिवूड अभिनेत्री प्रीती झिंटाच्यावतीनं मुंबई उच्च न्यायालयास सांगितलंय. मात्र हे प्रकरण संपावावं अशी इच्छा असली तरी नेस वाडीया माफी मागणार नाहीत असं त्यांच्या वकिलांनी हायकोर्टात सांगितलंय. कारण प्रीती झिंटा केवळ मीडियाचं लक्ष वेधण्याच्या प्रयत्नात असल्याचा आरोप वाडियाचे वकील आभात फोंडा यांनी केलाय. 'झालं तेवढ पुरे झालं आता हे प्रकरण समोपचारानं मिटवा', असं मत व्यक्त करत न्यायमूर्ती रणजित मोरे यांनी पुढील सुनावणीच्यावेळी नेस वाडिया आणि प्रीती झिंटाला ९ ऑक्टोबरलाहायकोर्टात हजर राहण्याचे निर्देश दिलेत.