Sachin Tendulkar | 10 वर्ष प्रतिसाद नाही, सचिन तेंडुलकरचा नागरी सन्मान बीएमसीकडून रद्द | मुंबई | ABP Majha
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला पुरस्कार घ्यायला गेल्या 10 वर्षांपासून वेळ मिळालेला नाही. त्यामुळे मुंबई महापालिकेचा सचिन तेंडुलकरसाठी जाहीर झालेला नागरी सन्मान पुरस्काराचा प्रस्ताव रद्द करण्याची नामुष्की पालिकेवर ओढवली आहे. 2005 साली महापालिका गटनेत्यांच्या बैठकीत कसोटी शतकांचा विक्रम करणाऱ्या सचिन तेंडुलकरचा मुंबईकर म्हणून महापालिकेकडून नागरी सत्कार करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला होता. मात्र सचिन तेंडुलकरकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने अखेर पालिकेवर नागरी सत्कार प्रस्ताव मागे घेण्याची वेळ आली आहे. 2010 साली क्रिकेटर सचिन तेंडुलकरचा नागरी सत्कार करण्याचा प्रस्ताव सभागृहात मंजूर झाला होता. त्यानंतर दहा वर्षे हा प्रस्ताव सचिन तेंडुलकर यांनी न दिलेल्या प्रतिसादामुळे पडून राहिला. पुरस्कारासाठी वेळोवेळी पाठवलेल्या पत्रांना सचिन तेंडुलकरने अपेक्षित प्रतिसाद दिला नाही.