अंधेरी पूल दुर्घटना : जीव गेल्यावरच मदतीची घोषणा का, रेणुका शहाणेंचा फेसबुकवरुन संताप
अंधेरीतील गोखले ब्रिजचा फुटपाथ कोसळून पाच जण जखमी झाल्याच्या घटनेवरुन अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी सरकारच्या अकार्यक्षमतेवर खरमरीत टीका केली आहे. या फेसबुक पोस्टद्वारे त्यांनी अनेक महत्वाचे प्रश्न उपस्थित केले आहेत. ‘एखाद्या दुर्घटनेत कोणाचा तरी जीव गेल्यावरच किंवा मोठं नुकसान झाल्यावरच मदतीची घोषणा करणं राजकारण्यांना इतकं सोपं का झालंय,’ असा उद्विग्न सवाल त्यांनी सरकारला केला आहे. रेणुका शहाणेंच्या मते, हा करदात्यांचा पैसा असल्याने नुकसान झाल्यावरच मदत करणं राजकारण्यांना सोपा मार्ग वाटतो. ‘तुम्हाला जर असा प्रश्न पडला असेल की,‘राजकारण्यांना किंवा प्रशासनातील लोकांना ज्या कामासाठी निवडलं गेलंय त्यांना ते काम का करता येत नाही?’ तर त्याचं उत्तर सोपं आहे. सरकारने अशी कामं केली तर त्यांना पैसाही खाता येणार नाही आणि अभ्यासदौऱ्याच्या नावाखाली परदेशातही फिरायला जाता येणार नाही’, असं रेणुका शहाणेंनी म्हटलं आहे.