मुंबई : मोदींचं काम देशहितासाठी, त्यांना पुन्हा संधी द्या : कंगना रनौत
पंतप्रधान नरेंद्र मोदी देशहिताचं काम करत आहेत, त्यांना पुन्हा संधी द्या, अशी मागणी अभिनेत्री कंगना रनौतने केली आहे. मोदींच्या आयुष्यावर आधारित शॉर्ट फिल्मच्या स्क्रीनिंगवेळी कंगनाने स्तुतिसुमनं उधळली. नरेंद्र मोदी आई-वडिलांमुळे नाही, तर स्वबळावर आज इतक्या उंचीवर जाऊन पोहोचले आहेत. मोदी देशहिताचं काम करत आहेत, त्यांना पुन्हा संधी द्या, असं आवाहन कंगनाने केलं. नरेंद्र मोदी हे लोकशाहीचे सर्वोत्तम नेते आहेत. आपण त्यांना पंतप्रधानपदी निवडून दिलं. आता आपण त्यांच्याकडून हे पद हिरावून घेऊ शकत नाही. मेहनतीने त्यांनी हे पद कमावलं आहे, असं कंगना म्हणते. मुंबईतल्या लोअर परळ भागातील फिनिक्स मॉलमध्ये शनिवारी रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आयुष्यावर आधारित 'चलो जिते है' या शॉर्ट फिल्मचं स्क्रीनिंग झालं. त्यावेळी स्क्रीनिंगला उपस्थित असलेल्या कंगनाने हे आवाहन केलं.