VIDEO | पालिकेच्या जागेवरील गिरणी कामगारांच्या घरांचा प्रश्न लटकला | मुंबई | एबीपी माझा
गिरणी कामगारांना घरे बांधण्यासाठी पालिकेने म्हाडाला दिलेल्या भूखंडाचा प्रस्ताव राखून ठेवल्याने सुधार समितीत शिवसेना- विरोकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. संतप्त काँग्रेसच्या नगरसेवकांनी सभागृहातल्या अध्यक्षांच्या आसनासमोर ठिय्या मांडून घोषणाबाजी सुरु केली. भाजपनेही उभे राहून विरोधकांच्या सूरात सूर मिसळून शिवसेनेला एकटे पाडले. अखेर अध्यक्ष दिलीप लांडे यांना सभा तहकूब करून काढता पाय घ्यावा लागला. मात्र त्यानंतरही काँग्रेसच्या नगरसेवकांनी अध्यक्षांच्या दालनासमोर ठिय्या मांडून घोषणाबाजी करून लक्ष वेधले. गिरण्यांच्या पुनर्विकासांतर्गत म्हाडा प्राधिकरणाला प्राप्त झालेल्या सहा लहान आकाराच्या भूभागांची अदलाबदल करून त्याबदल्यात महापालिकेच्या ताब्यातील एक संपूर्ण भूखंड म्हाडाला गिरणी कामगारांच्या घरांसाठी देण्याचा प्रस्ताव आहे. तर म्हाडाच्या जागांवर पालिकेने सहा नवी उद्याने विकसित करण्याचे धोरण आखले आहे.