लोणावळा : खंडाळ्याजवळ केवळ एका कर्मचाऱ्यासाठी रेल्वे थांबवण्याचा घाट महागात?
खंडाळा येथे रेल्वे रुळावरून उतरण्यामागचं धक्कादायक कारण समोर आलं आहे. मदुराई एक्सप्रेस ही रेल्वे खंडाळा येथे थांबा घेत नसताना, केवळ एका रेल्वे कर्मचाऱ्यासाठी तिथे थांबवण्याचा घाट घालण्यात आल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे. खंडाळा येथून त्या कर्मचाऱ्याला लोणावळ्यात सोडण्यात येणार होतं. लोणावळ्यात मात्र ही रेल्वे रीतसर थांबा घेते. या एका प्रवाशासाठी शेकडो प्रवाशांचा जीव धोक्यात घालण्यात आला, हे आता यावरून स्पष्ट झालं आहे. त्यामुळे नेमकं कोणी आणि कोणासाठी हा घाट घातला होता हे आता चौकशीत समोर येणं अपेक्षित आहे. यात मागील इंजिनच्या चालकाला याची माहिती होती का नाही हे मात्र अस्पष्ट आहे. या दुर्घटनेमुळे दिवसभर रेल्वेच्या वेळापत्रकावर परिणाम झाला.