कल्याण : पाचवा 'खड्डा'बळी, सरकारला जाग कधी येणार ?
कल्याणमध्ये गेल्या महिनाभरात खड्ड्यांमुळे पाचवा बळी गेलाय. खड्ड्यात बाईक आदळल्यानंतर मागून आलेल्या ट्रकखाली चिरडून तरुणाचा जीव गेल्याची घटना काल रात्री घडलीय. कल्याणच्या गांधारी पुलाजवळ हा प्रकार घडलाय. कल्पेश जाधव हा आपल्या बाईकने जात असताना त्याची बाईक खड्ड्यात आपटली. त्यावेळी मागून आलेल्या ट्रकने त्याला चिरडलं. गेल्या काही दिवसात कल्याण आणि परिसरात खड्ड्यांमुळे अनेक अपघात झाले आहेत. महिनाभरात खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातात ५ जणांचा जीव गेलाय. काही दिवसांपूर्वीच रस्त्याच्या चुकीच्या बांधणीमुळे एका महिलेचा बसच्या चाकाखाली चिरडून बळी गेल्याची घटना घडली आहे. त्यामुळे आता अजून किती जीव गेल्यावर सरकारला जाग येणार, असा सवाल संतप्त नागरिक विचारत आहेत. तर पालिका अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यधाचा गुन्हा दाखल करा अशी मागणीही केली जात आहे.