गोंदिया | देवरीत चक्रीवादळाचा तडाखा, तीस घरांचे छत कोसळले
गोंदियाच्या देवरी तालुक्यातील डोंगरगावाला चक्रीवादळाचा तडाखा बसलाय. सध्या गावातील तब्बल तीस घरांचा काही भाग आणि छत कोसळले आहे. तसेच एका ठिकाणी छत कोसळून एक बैल मृत्यूमुखी पडला आहे. कालरात्रीपासूनच गावातील वीज पुरवठा खंडीत झाला आहे. आज दिवसभरात गावातील स्थानिक तलाठी आणि मंडल अधिकारी यांनी नुकसानीचे पंचनामे केले आहेत. सुदैवाने कोठेही मानवी जीवनाचे नुकसान झालेले नाही. दरम्यान शेतातील फळझाडे कोलमडल्याने शेतकरी अस्मानी संकटात भरडला आहे.