घे भरारी : गुडन्यूज : मराठमोळ्या डॉ. रखमाबाई राऊत यांना गूगलचा सलाम
डूडलच्या माध्यमातून महान व्यक्ती, महत्त्वाच्या घटना इत्यादींची आठवण करुन देणाऱ्या गूगलने आज अशा व्यक्तीचं डूडल तयार केलं आहे, ज्या व्यक्तीने भारतीय वैद्यकीय क्षेत्रात बहुमोल कामगिरी केली आहे. ती व्यक्ती म्हणजे, डॉ. रखमाबाई राऊत.
मराठमोळ्या डॉ. रखमाबाई राऊत या भारतात वैद्यकीय सेवा देणाऱ्या पहिल्या महिला डॉक्टर होत. ज्या काळात महिलांना दुय्यम स्थान दिले जात होते, अशा काळात रखमाबाई राऊत यांनी परिस्थितींवर मात करुन यशाचं शिखर गाठलं.
रखमाबाई यांचा जन्म 22 नोव्हेंबर 1864 रोजी मुंबईत झाला. रखमाबाई यांच्या आईचा बालविवाह झाला होता. वयाच्या 14 व्या वर्षी रखमाबाईंच्या आईचं म्हणजे जयंतीबाईंचं लग्न झालं होतं, 15 व्या वर्षी रखमाबाईंच्या रुपाने मुलगी झाली आणि 17 व्या वर्षी त्यांचा पती म्हणजे रखाबाईंच्या वडिलांचे निधन झाले. अवघ्या 17 व्या वर्षी जयंतीबाई विधवा झाल्या आणि रखमाबाईंच्या डोक्यावरील पितृछत्र हरपलं. पुढे जयंतीबाईंनी डॉ. सखाराम राऊत यांच्याशी दुसरं लग्न केलं.