Shivpratap Garudjhep Review: लाल किल्ल्यातील शूटिंग ते आग्रा सुटकेचा थरार, कसा आहे शिवप्रताप गरुडझेप?
Shivpratap Garudjhep: शिवप्रताप गरुडझेप या सिनेमाची सर्वात मोठी जमेची बाजू आहे ती म्हणजे डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी साकारलेले छत्रपती शिवाजी महाराज. जो चेहरा छोट्या पडद्याच्या माध्यमातून जनमानसात छत्रपती शिवराय म्हणून रुजला, ज्या चेहऱ्याची ओळखच राजा शिवराय म्हणून झाली, त्या अमोल कोल्हेंना त्याच भूमिकेत रुपेरी पडद्यावर पाहणं हा सोहळा आहे. भूमिकेतले छोटे छोटे बारकावे, त्यातला आवेश, त्यातला त्वेश, त्यातली निरागसता, त्यातली आक्रमकता, त्यातलं प्रेम, त्यातली काळजी सारं काही त्यांच्या थेट डोळ्यातून उतरतं. अत्यंत निर्वाणीच्या क्षणीही चेहऱ्यावर अत्यंत सहजपणे फुलणारं हसू त्या भूमिकेला आणखी उंचीवर घेऊन जातं. त्यामुळं तुम्ही जर अमोल कोल्हेंना छोट्या पडद्यावर साकारलेल्या छत्रपतींच्या प्रेमात असाल तर मोठ्या पडद्यावरची ही कमाल पाहायलाच हवी. सिनेमाची आणखी एक जमेची बाजू म्हणजे प्रत्यक्ष लाल किल्ल्यात झालेलं शूटिंग. खरं तर शूटिंग कुठेही झालं असलं तरी तुम्हाला पडद्यावर काय आणि कसं दिसतं हे जास्त महत्वाचं. आणि त्याच गोष्टीमध्ये या सिनेमाची टीम यशस्वी झाली आहे. त्या किल्ल्याची, त्या वास्तूची भव्यता तितक्याच उत्तम पद्धतीनं रुपेरी पडद्यावर उतरली आहे. अर्थात याचं क्रेडिट सिनेमॅटोग्राफर म्हणून कमबॅक करणाऱ्या संजय जाधव यांना द्यायला हवं. कदाचित कमबॅक शब्द त्यांना आवडणार नाही कारण कॅमेरा हे त्यांचं पहिलं प्रेम आहे. पण त्यांच्या कॅमेऱ्याने या सिनेमाला आणखी देखणं बनवलं आहे.